Rajan Salvi ACB Enquiry : रत्नागिरी : ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांच्या कुटुंबीयांची अलिबाग (Alibag) येथील एसीबी कार्यालयात (ACB Office) उद्या (10 जानेवारी 2023) चौकशी होणार आहे. वैद्यकीय कारणास्तव राजन साळवी यांच्या वहिनी चौकशीला गैरहजर राहणार आहेत. तर, साळवी यांचे बंधू आणि पुतण्या चौकशीला सामोरे जाणार आहेत. एसीबीसमोर ज्यावेळी साळवी यांचे कुटुंबीयांसोबत चौकशीला हजर राहणार आहेत. त्याचवेळी त्यांच्यासोबत स्वतः राजन साळवीही उपस्थित राहणार आहेत. 


उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही : राजन साळवी


भविष्यात मला कितीही त्रास झाला, अटक झाली, तरी मी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, असं कुटुंबीयांच्या एसीबी चौकशीबाबत बोलताना आमदार राजन साळवी म्हणाले आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले की, उद्या माझी आणि माझ्या कुटुंबीयांची एसीबी चौकशी आहे. भविष्यात मला कितीही त्रास झाला अटक झाली तरी मी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही. तसेच, मी शेवटपर्यंत शिवसेनेतच राहणार कुठेही जाणार नाही, उदय सामंत यांनी राजापूर येथे बोलताना केलेल्या टीकेला राजन साळवी यांनी उत्तर दिलं आहे. 


आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालावरही राजन साळवींनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "उद्याचा निकाल आमच्या बाजूने लागेल हा आम्हाला विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेले निर्णय पाहता, त्यामध्ये केलेले उल्लेख पाहता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमच्या बाजूने निर्णय देतील."


राजन साळवींच्या अडचणींत वाढ 


राजापूरचे उद्धव ठाकरे समर्थक आमदार राजन साळवी यांच्या एसीबी चौकशीमुळं निर्माण झालेल्या अडचणी आणखी वाढताना दिसत आहेत. लाचलुचपत विभागानं काही दिवसांपूर्वी राजन साळवींच्या कुटुंबीयांना नोटीस धाडून चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलेलं. तसेच, काही दिवसांपूर्वी राजन साळवी यांची चौकशी एसीबीकडून करण्यात आली होती. त्यावेळी अलिबागच्या एसीबी कार्यालयाच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राजन साळवींचा बंगला आणि रत्नागिरी शहरातील त्यांच्या हॉटेलचं मूल्यांकन करण्यात आलं होतं. 


राजन साळवींचं घर, हॉटेलचं एसीबीकडून मुल्यांकन 


राजन साळवी यांच्या मालमत्तेबाबत एसीबीकडून चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळं एसीबी चौकशी आणि त्यांना लागणारी माहिती यासाठी राजन साळवींनी आतापर्यंत तीनवेळा अलिबागच्या एसीपी कार्यालयात हजेरी लावली आहे. त्यानंतर एसीबीकडून राजन साळवींचा बंगला आणि रत्नागिरी शहरातील हॉटेलचं मूल्यांकन करण्यात आलं होतं. त्यात घर आणि हॉटेलच क्षेत्रफळ, एकूण जमिनीची किंमत, तसेच इंटरियर डिझाईनिंग अर्थात सजावटीसाठी करण्यात आलेला खर्च यांचं मूल्यांकन करण्यात आलं आहे. यासर्व प्रकाराबाबत बोलताना या साऱ्या गोष्टी राजकीय दबावापोटी सुरू असल्याचा आरोप राजन साळवींनी केला होता. 


पाहा व्हिडीओ: Rajan Salvi Update : आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबीयांची एबीसी चौकशी, अलिबाग कार्यालयात होणार हजर