मुंबई : कोविडच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये अनेक रुग्णांना हॉस्पिटल शिवाय आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या होत्या. अनेक ठिकाणी डॉक्टरांची सुद्धा कमतरता असलेली पाहायला मिळाली. याच अनुषंगाने राज्यात वैद्यकिय सुविधा वाढवण्यासाठी वैद्यकिय शिक्षण विभागाच्या वतीने आता जिल्हा तिथं वैद्यकिय महाविद्यालय ही संकल्पना राबवली जाणार आहे. त्यातून राज्यातील एमबीबीएसच्या 2600 प्रवेश जागा वाढणार तर आहेत आणि एक कोटीहून अधिक रुग्णांवर उपचार करता येणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबई आणि पुण्यातील वैदकीय व्यवस्थेवरील ताण कमी होणार आहे.
कोरोनाच्या महामारीत अनेक रुग्णांचा हॉस्पिटल आणि उपचाराअभावी मृत्यू झाल्याच्या घटना राज्यात घडल्या आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना आपल्याच जिल्ह्यात चांगल्या उपचाराच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी वैदकीय शिक्षण विभाग जिल्हा तिथे वैदकीय महाविद्यालय सुरू करत आहे. मात्र एवढी मोठी यंत्रणा उभी करण्यासाठी राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे म्हणून सार्वजनिक-खासगी गुंतवणुकीच्या (पीपीपी) माध्यमातून राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि अतिविशेषोपचार रुग्णालये सुरू करण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे एमबीबीएस आणि इतर जागा मोठया प्रमाणावर वाढणार आहेत.
- सध्या राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या आणि एमबीबीएस अभ्यासक्रम प्रवेश क्षमता
- शासकीय/ महानगरपालिका वैदकीय महाविद्यालय - 25 महाविद्यालयात एकूण जागा 4330
- खाजगी विना-अनुदानित- 18 महाविद्यालयात 2270 जागा आहेत
- अभिमत विद्यापीठ- 12 महाविद्यालयात एकूण 2200 जागा
- आर्मड् फोर्स मेडिकल कॉलेज पुणे 1 एकूण जागा 50
- एम्स नागपूर मध्ये 60 जागा आहेत
- एकूण महाराष्ट्रात 57 वैद्यकीय महाविद्यालय असून 8910 एमबीबीएसच्या जागा आहेत
- ही नवीन महाविद्यालय सुरू झाली तर तब्बल राज्यातील 2600 एमबीबीएस च्या जागा वाढणार आहेत.
- त्यात नवीन सुरू होणाऱ्या महाविद्यालयात 1800 आणि विद्यमान महाविद्यालयात सुधारणा केल्यास 800 जागा वाढणार आहेत.
- पदव्युत्तर एमडी, एमएस आणि डीएनबी अभ्यासक्रमातील प्रवेशाच्या जागा
- शासकीय /महानगरपालिकेची एकूण 23 महाविद्यालय एकूण जागा 2362
- खाजगी विनाअनुदानित 19 महाविद्यालय एकूण जागा 685
- अभिमत विद्यापीठ 10 महाविद्यालय एकूण जागा 1286
- एकूण महाविद्यालयीन संख्या 52 त्यातील एकूण जागा 4333
- नवीन महाविद्यालय सुरू झाली तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता एक हजाराने वाढेल त्यात नवीन महाविद्यालयात 350 आणि विद्यमान महाविद्यालयात 650 जागा वाढणार आहेत
या नवीन योजनेमुळे एमबीबीएस आणि पदव्युत्तर प्रवेश क्षमता वाढणार आहे. तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. अनेक जिल्ह्यात रुग्णालय आणि वैद्यकीय सुविधा पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होताना पाहायला मिळतात. त्यामुळे या नवीन योजनेचा रुग्णांना चांगलाच फायदा होणार आहे.
- या नवीन वैदकीय महाविद्यालयामुळे तब्बल 1 कोटी नवीन रुग्णांची संख्या ओपीडी मध्ये वाढणार आहे. तर आयपीडीमध्ये 10 लाख रुग्णांची संख्या वाढणार आहे.
- तब्बल 2500 रुग्णांवर गंभीर शस्त्रक्रिया करता येतील.
सध्या राज्यात 18 जिल्ह्यात वैदकीय महाविद्यालय आहेत. 3 जिल्ह्यामध्ये नवीन महाविद्यालय प्रस्तावित आहेत तर परभणी, रत्नागिरी, भंडारा, अमरावती, बुलढाणा, अहमदनगर, पालघर, गडचिरोली, वाशीम, हिंगोली, जालना, मुंबई उपनगर आणि ठाणे या तेरा जिल्ह्यात शासकीय वैदकीय महाविद्यालय नाहीत. त्यामुळे या 13 जिल्ह्यात वैदकीय महाविद्यालय सुरू करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.
राज्याच्या अनेक जिल्ह्यात वैदकीय सुविधा नसल्याने मुंबई आणि पुणे सारख्या शहरातील वैदकीय व्यवस्थावर ताण पाहायला मिळत आहे. या नवीन योजनेतून वैदकीय महाविद्यालय सुरू झाली तर त्याच जिल्हयात उपचार होणार आहेत. आणि एमबीबीएस आणि इतर अभ्यासक्रमाची प्रवेश मर्यादा ही वाढणार आहे.