गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात अवैध जंगलतोडीचे धक्कादायक प्रकरण पुढे आले आहे. जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचाऱ्याने 50 एकर जंगल साफ केले आह. पोर्ला वनपरिक्षेत्रातील चुरचुरा गावातील घटनेने वनविभागात खळबळ उडाली आहे. सात एकर खाजगी जमीन विकत घेत आजूबाजूचे 50 एकर जंगल जेसीबीने तोडून टाकले आहे. महाकाय लाकडे जमिनीत खड्डे करून टाकली पुरून टाकली आहे. गावाच्या वन व्यवस्थापन समितीने वनविभाग आणि महसुली उच्चाधिका-याना तक्रारी करत प्रकरण लावून धरले. तेव्हा खडबडून जागे झालेल्या वनविभागाने चौकशी केली. अद्याप गुन्हे दाखल होऊनही अटक मात्र झालेली नाही.
गडचिरोली तालुक्यात चुरचुरा गावातील जंगलालगत असलेली थोडीशी शेती विकत घेऊन त्या लगत असलेल्या पन्नास एकर जंगलच तोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या गावाशेजारी वृक्षांची बेसुमार कत्तल करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेत महिला कर्मचारी असलेल्या गायत्री फुलझेले यांनी या भागातील 7 एकर अतिक्रमण केलेली शेती विकत घेतली होती. त्या सात एकर शेतीत बारीक झुडपे असल्याने तोडण्यासाठी वन विभागाकडून परवानगी घेतली. मात्र ही परवानगी मिळाल्यानंतर स्वतःचे जागेएवजी वनविभाग आणि महसूल विभागाच्या जमिनीवर असलेले अंदाजे पन्नास एकर जंगल जेसीबी आणि पोकलेन मशीन लावून पूर्ण भुईसपाट केले. त्यानंतर कत्तल केलेल्या पाचशेपेक्षा झाडांची लाकडे पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच ठिकाणी जमिनीत पुरण्यात आली.
गावच्या वनव्यवस्थापन समितीने यासंदर्भात वनविभागाकडे तक्रार केल्यानंतर वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट देऊन पंचनामा केला आणि जमिनीत पुरुन ठेवलेली सगळी लाकडे जेसीबीच्या मदतीने बाहेर काढली. हा संपूर्ण प्रकार आठ दिवस या जंगलात सुरू होता. आता यासंदर्भात गायत्री फुलझेले यांच्यासह त्यांची दोन मुले अशा एकूण 4 जणांवर वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. फुलझेले कुटुंबीय सध्या फरार झाले आहे. मात्र या संदर्भात एकाही वनकर्मचा-यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. गावकऱ्यांनी हे प्रकरण तडीस नेण्याचा निर्धार केला आहे.