सोलापूर : गोवर आणि रुबेला लस आरोग्यासाठी धोकादायक नाही, हे सरकारनं वारंवार सांगूनही राज्यात या दोन्ही लसींसदर्भात भीती कायम आहे. सोलापुरातील 41 शाळांनी गोवर आणि रुबेला लस घेण्यास नकार दिला आहे. लसीमुळे नपुंसकत्व येत असल्याच्या गैरसमजातून शाळांनी लस घेण्यास नकार दिला आहे.


महापालिका आयुक्तांनी या शाळा व्यवस्थापनाचं मन वळवण्यासाठी उद्या सकाळी बैठक बोलावली आहे. बहुसंख्य शाळा मुस्लीम बहुल भागातील आहेत. आमच्या डॉक्टरांनी सांगितलं तरच लस देऊ, अशा या शाळा व्यवस्थापनाचा आग्रह आहे.


गेल्या काही दिवसांपासून गोवर-रुबेला लस घेतल्यामुळे नपुंसकत्व येते अशी अफवा सोशल मीडियावर पसरली आहे. ही लस देऊन मुस्लीम समाजाला नपुंसक करण्याचे सरकारचे षडयंत्र आहे, अशा आशयाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे मुस्लीम समाज या लसीला तीव्र विरोध करत आहे. प्रशासनातर्फे याबाबत जनजागृती सुरु झाली आहे.


लसीकरणाने मुलांच्या आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होणार नाही


गोवर आणि रुबेला लसीकरणाने मुलांच्या आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नसल्याचं डॉ.दीपक सावंतांनी स्पष्ट केलं. प्रत्येक पालकाने आपल्या मुलाला भविष्यातला त्रास टाळण्यासाठी आजच ही लस देण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं. दीपक सावंत यांनी आपल्या नातीला देखील ही लस देणार असल्याचं सांगितलं. एक आजोबा या नात्यानं राज्यातील सगळ्या मुलांची जबाबदारी आपल्यावर असून या लसीकरण मोहिमेत कोणतीही चूक होणार नाही असं राज्यभरातील पालकांना त्यांनी आश्वस्त केलं.


अशी आहे लसीकरण मोहीम


- 30 नोव्हेंबरपासून सहा आठवडे राज्यात सर्वत्र ही लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे.
- 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील बालकाचे लसीकरण करणे आवश्यक आहे.
- शाळा, सरकारी दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांवर मोफत लसीकरण उपलब्ध आहे.
- या आधी गोवर/ एमआर / एमएमआर लस दिली असल्यास पुन्हा या मोहिमेत लसीकरण करणे आवश्यक आहे
- पुन्हा लसीकरणाने कोणतेही दुष्परिणाम होणार नाही.
- एक गोवर-रुबेला लस दोन आजारांवर मात करते.


संबंधित बातम्या


गोवर-रुबेला लसीमुळे नपुंसकत्व येत असल्याची अफवा, जनजागृती सुरु


गोवर, रुबेला लसीमुळे 29 विद्यार्थ्यांना रिअ‍ॅक्शन


 गोवर आणि रुबेला लसीकरणानंतर तीन विद्यार्थिनींना रिअॅक्शन