सांगली : चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. 8500 इतका विसर्ग वारणा नदी पात्राता सुरू आहे. त्यामुळे वारणा नदी धोक्याच्या पातळीवर आहे. तर सांगलीच्या कृष्णा नदीची वाढलेली पाणी पातळी ओसरली आहे. दीड फुटांनी पाणी पातळी कमी झाली असून 22 फुटांवर पोहचली आहे. संततधार पावसामुळे गेल्या 5 दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढू सुरू आहे. मात्र यामधील कृष्णा नदीच्या पाण्याची वाढ शुक्रवार पासून थांबली आहे.


गेल्या चार दिवसात कृष्णेची पाणी पातळी 18 फुटांनी वाढ होऊन 23.5 फुटांवर पोहचली होती. शुक्रवार सायंकाळपासून ही वाढ थांबून पातळी स्थिर झाली होती. आणि शनिवार सकाळपासून पाण्याची पातळी ओसरू लागली आहे. दीड फुटांनी पाण्याची पातळी घटली आहे. त्यामुळे सांगलीच्या आयर्विन पूल येथील पाण्याची पातळी ही 22 फुटांवर पोहचली आहे. तर दुसऱ्या बाजूला वारणा नदी धोक्याचया पातळीवर पोहचली आहे.


शिराळा तालुक्यात सुरू असलेली पावसाची संततधार आणि चांदोली धरणातून सोडण्यात येत असलेले पाणी यामुळे 2 दिवसांपूर्वी वारणा नदी पात्राबाहेर पडली आहे. यामुळे मांगले-काखे हा पूल आणि 3 बंधारे पाण्याखाली गेल्याने शिराळा तालुक्याचा कोल्हापूर जिल्ह्याशी असणारा संपर्क तुटलेलाच आहे. तर सध्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम असून गेल्या 24 तासात 75 मिलीमीटर पाऊसाची नोंद झाली आहे. त्यामुळे 34 टीएमसी साठवण क्षमता असणाऱ्या चांदोली धरणात 29.45 टीएमसी इतका पाणीसाठा होऊन धरण 85 टक्के भरले आहे.


या पार्श्वभूमीवर धरण प्रशासनाकडून गुरूवार पासून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच असून शुक्रवार पासून तो वाढवण्यात आला आहे आणि शनिवारी सकाळी 8,500 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा नदीत सुरु आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे. वाढत्या पाण्याच्या पातळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


Sangli Rain Update | सांगलीत पावसाचा जोर कमी, कृष्णेची पाणीपातळी स्थिर