गोंदिया : जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धान्याची उचल न झाल्याने रब्बी पिकाच्या धानाची खरेदी अद्यापही हव्या त्या प्रमाणात सुरु करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे धान्य त्यांच्या घरीच पडून असून पावसाळी पिकाची लागवड कुठून करायची असा प्रशन शेतकऱ्यांना पडला आहे तर याच संदर्भात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना खरीप हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धान्य प्रक्रियेत मोठा घोळ झाल्याचा आरोप त्यांनी केला. या संदर्भात गोंदिया जिल्हाधिकऱ्यांना चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. 


धान उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी खरीप हंगामात अडीच लक्ष हेक्टर शेत जमिनीवर भात पिकाची लागवड केली जाते. तर रब्बी हंगामात जवळपास 65 हजार हेक्टर शेत जमिनीवर धान पिकाची लागवड केली जाते. खरीप हंगामात आधारभुत किमतीने शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेला धान्य अद्यापही धान्य खरेदी केंद्रावर पडून आहे. त्यामुळे रब्बी हंगामाची खरेदी वेळेवर सुरु न झाल्याने धान्य कुठे विकायचे असा प्रश्न चुटिया गावातील शेतकरी कुवरलाल तुरकर यांना पडला आहे. 


कुवरलाल यांच्याकडे 4 एकर धान शेती असून त्यांनी खरीप हंगामात धान पिकाची लागवड करीत आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर विक्री केली. मात्र, शासनाने 700 रुपये बोनस घोषित करून रक्कम दिली नसल्याने शेतकरी अडचणीत आले. कुवरलाल यांनी लोकांकडून पैसे उसने घेत रब्बी पिकांची लागवड करीत उत्पादन घेतलंय. यावर्षी गोंदियात पणन विभागातर्फे 105 केंद्रांना धान्य खरेदीची मंजूरी देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात नव्याने सुरु करण्यात आलेल्या 42 खरेदी केंद्र चालकांनी नाममात्र उद्घाटन केले. प्रत्यक्षात हव्या त्या प्रमाणात खरेदी सुरु झाली नाही.


याच मुद्याला घेऊन आता भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. स्वतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मागील हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धान्य प्रक्रियेत मोठा घोळ झाला असल्याचा आरोप केला आहे. तर प्रत्यक्षात रब्बी हंगामात दर वर्षी 1 मे ते 30 जून या कालावधीत धान्य खरेदी केली जाते. मात्र, यावर्षी ही धान्य खरेदी कागदोपत्री 28 मे ला करण्यात आली असली तरी कालपर्यंत 157 क्विंटल धान्याची आतापर्यंत खरेदी करण्यात आली आहे. लवकरात लवकर धान्य खरेदी प्रक्रिया सुरु झाली नाही तर आंदोलन छेडू असा इशारा भाजपने दिला आहे. मागील खरीप हंगामात गोंदियात 32 लाख 134 हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. रब्बी हंगामात अंदाजे 29 लाख क्विंटल धान्य खरेदी केली जाऊ शकते. मात्र, अद्यापही धान्य खरेदी केंद्र हवे त्या अपेक्षेने उघडण्यात आले नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.