बीड : भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान व संशोधन परिषद अर्थात आयसीएमआरच्या पथकाने पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये सिरो सर्वे केला आहे. यात जिल्ह्यातील आठ गाव व दोन शहरातील एकूण 443 नागरिकांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेतले होते. यापैकी तब्बल 33 जणांचे नमुने हे पॉझिटिव्ह आले आहेत. म्हणजे सरासरी 7.4 टक्के लोकांना बीड जिल्ह्यात कोरोना होऊन गेला आहे. दहा हजार कोरोना रुग्णांचा टप्पा पार करणाऱ्या बीड जिल्ह्यामध्ये सरासरी सात टक्के पेक्षा जास्त कोरोनाचा प्रसार झाला असल्याचे या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. एकूण बीड जिल्ह्यातील लोकसंख्येचा विचार करता दोन लाख 28 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली असल्याचा अंदाज या सर्वेक्षणातून काढता येऊ शकतो.
यापूर्वी पहिल्या टप्प्यामध्ये 21 मे रोजी आयसीएमआरच्या पथकाकडून बीड जिल्ह्यामध्ये 400 नागरिकांचे रक्त नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी चार जण नागरिक यापूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. म्हणजे एक टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्याचा निष्कर्ष पुढे आला होता. साडेतीन महिन्यापूर्वी केवळ 29 रुग्ण जिल्ह्यांमध्ये एक टक्के कोरोना पॉझिटिव्ह होते. आता जिल्ह्यातील रुग्णांची संख्याही दहा हजारांच्या पुढे गेली असताना सात टक्के लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे.
आयसीएमआरकडून बीड जिल्ह्यासह इतर पाच जिल्ह्यात हा सर्व्हे करण्यात आला. यामध्ये परभणी, नांदेड, सांगली, अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे. या सहा जिल्ह्यात पैकी सर्वात जास्त कोरोनाचा प्रसार हा जळगाव जिल्ह्यामध्ये झाला आहे. तर सर्वात कमी बीड जिल्ह्यात प्रसार झाल्याचे या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. यात अहमदनगर जिल्ह्यात 8.72 टक्के, जळगाव जिल्ह्यात 25.09 टक्के, परभणी जिल्ह्यात 15.2 टक्के, नांदेड जिल्ह्यात 9.7 टक्के आणि सांगली जिल्ह्यात 11.7 टक्के कोरोनाचा संसर्ग झाल्याचे या अहवालात पुढे आले आहे.
विशेष म्हणजे आयसीएमआरकडून पहिला सर्वे झाला त्यावेळी संपूर्ण देश लॉकडाऊन मध्ये होता. मात्र हा दुसरा सर्वे ज्यावेळी केला त्यावेळी परिस्थिती बदलली होती. म्हणजे अनलॉकच्या काळात कोरोनाचा प्रसार हा फार मोठ्या प्रमाणामध्ये होताना पाहायला मिळतोय. एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असतानाही मोठ्या प्रमाणात लोकांच्या शहरांमध्ये अँटीबॉडीज तयार होत असल्याचं या निष्कर्षातून समोर आले आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती जणांना कोरोना होऊन गेला?
बीड
एकूण घेतलेले नमुने: 443
त्यापैकी पॉझिटिव्ह नमुने: 33
पॉझिटिव्ह प्रमाण: 7.4 टक्के
परभणी
एकूण घेतलेले नमुने: 480
त्यापैकी पॉझिटिव्ह नमुने: 73
पॉझिटिव्ह प्रमाण: 15.2 टक्के
नांदेड
एकूण घेतलेले नमुने: 439
त्यापैकी पॉझिटिव्ह नमुने: 43
पॉझिटिव्ह प्रमाण: 9.8 टक्के
सांगली
एकूण घेतलेले नमुने:467
त्यापैकी पॉझिटिव्ह नमुने: 55
पॉझिटिव्ह प्रमाण: 11.7 टक्के
अहमदनगर
एकूण घेतलेले नमुने: 447
त्यापैकी पॉझिटिव्ह नमुने: 39
पॉझिटिव्ह प्रमाण: 8.72 टक्के
जळगाव
एकूण घेतलेले नमुने: 405
त्यापैकी पॉझिटिव्ह नमुने: 105
पॉझीटिव्ह प्रमाण: 25.9 टक्के
सर्वसामान्य लोकांमध्ये कोरोनाचा कितपत प्रसार झाला आहे हे जाणून घेण्याकरता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. राष्ट्रीय विषाणू संस्थेने विकसित केलेल्या इलायझा पद्धतीने करण्यात आली. त्याद्वारे या व्यक्तींच्या रक्तद्रवामधील प्रतिपिंडांचा (ॲन्टीबॉडी) शोध घेण्यात आला आहे. त्यासाठी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, नवी दिल्ली, राष्ट्रीय साथरोगशास्त्र संस्था, चेन्नई आणि राष्ट्रीय क्षयरोग संशोधन केंद्र, चेन्नई या संस्थांनी तांत्रिक सहकार्य केले.