नवी दिल्ली : महाराष्ट्रात राजकीय नाट्याचा नवा कोलाहल सुरू असताना बुधवारी रात्री खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी सुरांची मैफल रंगली. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या 15 सफदरजंग लेन या दिल्लीतील निवासस्थानी सुप्रसिद्ध गायिका मैथिली ठाकुर हिच्या गाण्यांच्या आणि स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला सर्व पक्षांचे राजकीय नेते विशेष आमंत्रित होते.
राज्यात परमबीर सिंह, सचिन वाझे आणि त्या संबंधित अनेक प्रकरणावरुन राजकीय धुळवड सुरु असताना दिल्लीत संजय राऊत यांच्या निवासस्थानी सुरांची मैफिल जमली. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे हे देखील उपस्थित होते. तसेच भाजपचे रावसाहेब दानवे आणि राज्यातील इतर प्रमुख नेतेही उपस्थित होते. एरवी रोज राजकीय टोलेबाजी करणारे राऊत आज मात्र या संगीत मैफिलीच्या माध्यमातून कलेचा मनमुराद आनंद लुटताना दिसत होते.
या वेळी संजय राऊत म्हणाले की, "मैथिली ठाकुर हिच्या गाण्यांचं आमचं सर्व कुटुंब फॅन आहे. कार्यक्रम ठरल्यानंतर आदित्य ठाकरे यांचा फोन आला. ते म्हणाले की काका तुम्ही मैफलीचा कार्यक्रम करताय, मला मैथिली ठाकुरचं गाणं ऐकायचं आहे."
महाराष्ट्रातले सूर सुद्धा मैथिलीच्या सुराइतकेच मधुर
सध्या महाराष्ट्रात वेगळे राजकीय सूर ऐकू येत आहेत. यावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "मला संगीताची आवड आहे हे सगळ्यांना माहिती आहे. राजकारणात असलो तरी साहित्य, संगीत, कला यांच्याशी माझी जवळीक कायम आहे. महाराष्ट्रातले सूर सुद्धा मैथिलीच्या सुराइतकेच मधुर आहेत."
राऊत सरांना भेटल्यानंतर ते माझे सगळे ब्लॉग व्हिडीओ पाहतात हे ऐकल्यावर मी थक्क झाले अशी प्रतिक्रिया गायिका मैथिली ठाकुरने दिली आहे.
संबंधित बातम्या :
- महाराष्ट्राची दिल्लीत 'खेलो होबे' सुरु, त्यासाठी मनोरंजन टॅक्सही नाही : संजय राऊत
- Sachin Vaze | मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये सचिन वाझेंचा तब्बल 100 रात्रींचा मुक्काम, NIA च्या तपासातून उघड