मुंबई : विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज महाविकास आघाडी सरकारमधील नेते राज्यपालांची भेट घेणार होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली होती. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुंबईत नसल्याने ही भेट टळणार आहे.
राज्यपाल देहरादून दौऱ्यावर आहेत. 28 मार्चपर्यंत ते देहरादून येथे असणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांची आजची भेट टळली आहे. राज्यपालांचा देहरादूनचा दौरा पूर्वनियोजित होता, ते 28 मार्चला मुंबईत परतणार आहेत, असं राजभवनाकडून सांगण्यात आलं आहे.
अँटिलिया बाहेरचं स्फोटकं प्रकरण, सचिन वाझे प्रकरण, मनसुख हिरण हत्या प्रकरण, परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप, राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांचं बदल्यांचं प्रकरण या सर्व घडामोडींनी राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. विरोधी पक्ष आक्रमकपणे महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करत आहे. कालच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेत राज्यातील घडामोडींची सविस्तर माहिती राष्ट्रपतींना द्यावी अशी मागणी केली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील नेते आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून महाविकास आघाडी सरकारवर लावण्यात आलेल्या आरोपांच्या सत्यतेची माहिती त्यांना देणार होते.
फडणवीसांनी केवळ पोलिसांचीच नाही तर एसआरएतील विकासकांना देखील नोटिस दिलेली, भाई जगतापांचा नवा आरोप
भाजपच्या शिष्टमंडळाने काल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतील. राज्य सरकारमध्ये नैतिकता उरली नाही. मुख्यमंत्री या प्रकरणांवर काही बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलतं केलं पाहिजे. राज्यपालांना भेटून आम्ही मागणी केली की, राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांकडून अहवाल घेतला पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.