सोलापूर : सोलापुरातील श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालयात ऑक्सीजनच्या टाकीचा स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली.  रात्री 11 च्या सुमारास रुग्णालयात असलेल्या दोन टाक्यांपैकी एका टाकीचा स्फोट झाला. त्यामुळे संपूर्ण रुग्णालयाच्या आसपासच्या परिसरात टाकीतील केमिकलयुक्त पावडर पसरली. मात्र हा स्फोट इतका भीषण होता की अनेकांना मानसिक धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. दरम्यान टाकीचा स्फोट नेमका कशामुळे झाला हे मात्र समजू शकलेले नाही. प्राथमिकदृष्टया केमिकल रिॲक्शनमुळे टाकीचा स्फोट झाला असण्याची शक्यता अग्निशमन दलाचे प्रमुख केदारनाथ आवटे यांनी व्यक्त केली. 


रुग्णालयाच्या आवारात असलेल्या ऑक्सिजन प्लांटमध्ये दोन मोठ्या टाक्या आहेत. त्यापैकी एक टाकी मागील काही दिवसांपासून बंद होती. तर दुसऱ्या टाकीतून रुग्णालयास ऑक्सीजन पुरवठा सुरु होता. बंद असलेल्या टाकीमध्ये अचानक ठिणगी येत असल्याचे काही जणांनी पाहिले. मात्र कोणालाही माहिती कळवण्याआधीच भीषण असा स्फोट झाला. प्लांटच्या बाजूला रुग्णांच्या नातेवाईंकासाठी प्रतिक्षालय आहे. या ठिकाणी असलेल्या अनेकांना याचा धक्का बसला. मागील बाजूस असलेल्या दरवाजाने या ठिकाणातील सर्व नागरिक बाहेर पळून आले. मात्र या स्फोटामुळे ऑक्सिजन निर्मितीसाठी टाकीत असलेली केमिकलयुक्त पावडर सर्वत्र पसरली होती. रात्री उशिरापर्यंत रुग्णालयात साफसफाईचे काम सुरुच होते. 




या घटनेची माहिती मिळताच अग्मिशमन दलाचे दोन पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणण्यात आली. पालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे यांच्यासह परिसरातील नगरसेवकांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसराची पाहणी केली. स्फोटामुळे रुग्णांचे नातेवाईक घाबरलेल्या परिस्थितीत होते. मात्र अधिकाऱ्यांनी स्वत: जाऊन सर्व रुग्णांच्या ऑक्सिजनची पातळी तपासली. नव्या टाकीद्वारे ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित होत असल्याने कोणतीही इजा या घटनेत झाली नाही.




मात्र स्फोट झालेल्या ठिकाणाच्या जवळ असलेल्या एका वॉर्डात केमिकलयुक्त पावडर मोठ्या प्रमाणात पसरल्याने तेथील रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं. विशेष म्हणजे या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर देखील उपचार केले जातात. मात्र सुदैवाने एक मोठी दुर्घटना टळली आहे. दरम्यान हा प्रकार नेमका कशामुळे घडला? सुरक्षेच्या नियमांचे पालन होत होते का याची चौकशी करुन जर कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करु असा इशारा पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिला. तर सर्व रुग्ण सुखरुप असून कोणतीही इजा झाली नसल्याचे स्पष्टीकरण पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी दिले.