सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टींसाठी चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी रेशन दुकानातील तांदळाच्या काळ्या बाजारासाठी तर आता चक्क गांजाच्या अवैध धंद्यासाठी चर्चेत आलाय. बार्शी शहर आणि तालुक्यात खुलेआम गांजा विक्री होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अॅड. सुहास कांबळे यांनी केला आहे. मात्र तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने थेट विशेष पोलिस महानिरीक्षकांना गांजाची पुडी पोस्टाने कांबळे यांनी पाठवली आहे. अॅड. सुहास कांबळे यांनी बार्शीत चालणाऱ्या अवैध धंद्याबाबत वेळोवेळी पोलिसांना तक्रारी दिल्या होत्या. मात्र तक्रारीची दखल न घेतल्याने शहरातून गांजा खरेदी करुन सोबत तक्रारी अर्ज कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांना पाठवल्याची माहिती सुहास कांबळे यांनी दिली.


यासंदर्भात बोलताना सुहास कांबळे म्हणाले की, "बार्शी शहर आणि जिल्ह्यात अनेक वर्षांपासून बेकायदेशीर धंदे सुरु आहेत. सर्व सामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास होतो. मटका, दारु आणि गांजा विक्री ही खुलेआम चालते. याठिकाणातील तरुणांनी नेमका काय आदर्श घ्यावा असा प्रश्न पडतो. तरुणांना व्यसनाधिकतेकडे जाण्यापासून रोखण्यासाठी मी पोलिस महासंचालक, विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधिक्षक यांना वेळोवेळी तक्रारी अर्ज दिले आहेत. त्या सोबत उपोषण आणि आंदोलन देखील केले आहेत. मात्र याची कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे विशेष पोलिस महानिरीक्षक यांना शहरातून विकत घेतलेली गांजाची पुडी आणि तक्रारी अर्ज पाठवला आहे. जर याही पत्राची दखल घेतली नाही तर मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करणार आहे."


याप्रकरणी एबीपी माझाने सोलापूर ग्रामीण पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. "बार्शी शहर आणि परिसरात गांजा विक्री होत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यावेळी संबिधत लोकांवर पोलिसांनी कारवाई केली होती. याही प्रकरणी संपूर्ण चौकशी करुन तात्काळ कारवाई करण्यात येईल" अशी प्रतिक्रिया पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी दिली.


लॉकडाऊनच्या काळात सर्व उद्योग बंद असताना अवैधरित्या गुटख्याचे उद्योग सुरु असल्याची बातमी काही दिवसांनी एबीपी माझाने समोर आणली होती. सोलापूर शहरात देखील अनोखी शक्कल लढवून विक्रीसाठी निघालेला अवैध गुटखा पोलिसांनी जप्त केला. सोलापुरातील आसारा चौक परिसरात अवैध गुटख्यानी भरलेला ट्रक निघाल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ट्रक अडवलं असता त्यामध्ये जवळपास 50 मोठी पोती गुटखा असल्याचे आढळले आहे. पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करता यावी यासाठी गुटख्याच्या समोर बेसनची पोती ठेवण्यात आली होती. मात्र पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर त्यांचा हा बनाव उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक कल्याणी तेजमाने वय 40 याच्यासह आणखी एकास ताब्यात घेतलं आहे. सोबतच अंदाजे 21 लाख 60 हजार रुपयांचा गुटखा, गुटखा लपवण्यासाठी वापरण्यात आलेला बेसन आणि ट्रक असा एकूण 35 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता. अशाच पद्धतीने राज्यभरात लॉकडाऊनच्या काळात लाखोंचा गुटखा जप्त झाल्याचं समोर आलं आहे. बार्शीत तर चक्क गांजा विक्रीच सुरु असल्याचं उघड झालंय. त्यामुळे राज्यात अंमली पदार्थांच्या अवैधरित्या चालणाऱ्या विक्रीवर कधी कारवाई केली जाणार असा प्रश्न सामान्यांना पडतोय.