Amar Habib : शेतकऱ्यांच्या आत्महत्या (farmer suicides) थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याशिवाय पर्याय नाही अशी ठोस भूमिका जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब (Amar Habib) यांनी व्यक्त केली. नांदेडच्या लोहा तालुक्यातील उमरा गावात अमर हबीब यांनी आज अन्नत्याग आंदोलन केलं. यावेळी ते बोलत होते. उमरा गावातील एका शेतकऱ्याने तहसील कार्यालयात जाऊन आत्महत्या केली होती. त्यासाठी आज श्रद्धांजली सभा घेत हे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. 


शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची गरज असल्याचे मत अमर हबीब यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत असल्यानं शेतकऱ्यांना मोबदला वाढवून मिळेल असा विश्वास देखील यावेली त्यांनी व्यक्त केला.


राज्यातील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. पीकपद्धती, सिंचनाची सोय, अर्थपुरवठा, शेतमालासाठी बाजारपेठ, जोडधंदे आणि शासकीय मदत या गोष्टींशी शेतकरीजीवन निगडित असते. महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या पश्चिम विदर्भात झालेल्या आहेत आणि हा पट्टा संत्रा, सोयाबीन व कापूस उत्पादकांचा आहे. विदर्भाचा अनुशेष 2004 मध्ये 10032 कोटी रुपयांचा होता आणि तो वाढतच आहे. परिणामी अल्प सिंचनामुळे शेतकऱ्यांवरची संकटे वाढतच आहेत. आतापर्यंत ज्यांनी आत्महत्या केल्या, ते शेतकरी बहुतेक कोरडवाहूचे कास्तकार होते. ते कर्जबाजारीही होते. राष्ट्रीय बँका शेतकऱ्यांना कर्जाऊ रक्कम सहज देत नाहीत. खासगी सावकार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची गळचेपी करत असल्याचं पाहाया मिळत आहे. 


आस्मानी आणि सुलतानी ही संकटे देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कारणीभूत आहेत. सातत्याने तोट्याच्या शेतीतून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक कुचंबणा हे आत्महत्यांचे मुख्य कारण मानले जाते. शेतीला सिंचन, विजेचा अभाव, महागडे बियाणे, खते, कीटकनाशके, पेरणीच्या हंगामात संस्थांत्मक पुरेशा कर्जपुरवठ्याचा अभाव, सावकारी बेहिशेबी कर्जाचा पाश, त्याच्या वसुलीसाठीचा तगादा, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे वाढते नुकसान, सक्षम विमा संरक्षण देण्यात सरकारला आलेले अपयश, कमी होत असलेली उत्पादकता, बाजारात शेतीमालाची होणारी लूट, कमी भाव ही शेती तोट्यात जाण्याची कारणे आहेत. पाठीशी कुणी नाही, ही एकटेपणाची भावना शेतकऱ्यांच्या वाढली आहे. शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले, तर बहुतांश शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू शकतील असे मत व्यक्त केले जाते.


महत्वाच्या बातम्या:


पतंजली फूड अँड हर्बल पार्क विदर्भातील शेतकरी आत्महत्यांची ओळख पुसून कृषी व्यवस्थेचं चित्र बदलणार; आचार्य बाळकृष्ण यांचा दावा