Nagpur : विदर्भाला शेतकरी आत्महत्यांसाठी ओळखलं जात होतं. मात्र आता 'पतंजली फूड अँड हर्बल पार्क' (Patanjali Mega Food and Herbal Park) विदर्भातील शेतकऱ्यांचे भाग्य बदलेल, असा दावा पतंजली समूहाचे आचार्य बाळकृष्ण यांनी केला आहे. योग गुरु रामदेव बाबा यांच्या पतंजलीच्या (Patanjali) फूड आणि हर्बल पार्कचे उद्घाटन येत्या 9 मार्च रोजी नागपुरातील मिहान सेझ (SEZ) मध्ये पार पडणार आहे. मात्र या प्रकल्पाची पायाभरणी ही सप्टेंबर 2016 मध्ये करण्यात आली होती. दरम्यान आतापर्यंत यामध्ये 1 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. शिवाय हे फूड आणि हर्बल पार्क आशियात खंडातील सर्वात मोठे पार्क असल्याचा दावाही आचार्य बाळकृष्ण यांनी केला आहे.
नागपूरसह विदर्भातील शेतकरी आणि बेरोजगारांसाठी महत्वाकांशी ठरलेल्या या फूड अँड हर्बल पार्कमधील संत्रा प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन होत असताना त्याच अनुषंगाने आचार्य बाळकृष्ण यांनी एबीपी माझाशी खास बातचीत केली. यावेळी बोलताना आचार्य बाळकृष्ण यांनी फूड अँड हर्बल पार्क आणि त्यामध्ये सुरू होणाऱ्या संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची सखोल माहिती दिलीय.
आशियातील सर्वात मोठे फूड पार्क शेतकऱ्यांचे भाग्य बदलेल- आचार्य बाळकृष्ण
पतंजली फूड अँड हर्बल पार्कमधून दररोज रोज 800 टन संत्रावर प्रक्रिया करू शकणाऱ्या भारतातील सर्वात मोठ्या आणि संपूर्ण आशिया खंडात सर्वात जास्त अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संत्रा प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन 9 मार्च रोजी नागपुरात होत आहे. योग गुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली समूहाने नागपूरच्या मिहान विशेष आर्थिक क्षेत्राजवळ पतंजली फूड अँड हर्बल पार्कची स्थापना केली असून त्याच्या पहिल्या टप्प्यात या संत्रा प्रक्रिया प्रकल्पाचा उद्घाटन केला जाणार आहे. 9 मार्च रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे.
पतंजली फूड अँड हर्बल पार्कची काय आहे वैशिष्ट्य?
- पतंजली फूड अँड हर्बल पार्कमधून दररोज 800 टन संत्र्यावर प्रक्रिया करून ज्यूस आणि इतर संत्रा आधारित पदार्थ तयार केले जातील.
- आम्ही शेतकऱ्यांकडून 'ए' ग्रेडचा संत्रा घेणार नाही, तो ग्राहकांसाठी बाजारात उपलब्ध रहावा, अशी आमची इच्छा असल्याचे आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितले.
-आम्ही शेतकऱ्यांकडून 'बी' व 'सी' ग्रेडचा म्हणजेच जो संत्रा कवडीमोल भावाने विकला जायचा, किंवा फेकून द्यावा लागायचा, तो संत्रा खरेदी करून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून देऊ, असेही ते म्हणाले.
- संत्राशिवाय आमच्या फूड पार्कमध्ये पेरू, द्राक्ष, डाळिंब, एलोवेरा, मोसंबी अशा विविध फळांवर आधारित ज्यूस व तत्सम पदार्थही तयार केले जातील. अशी माहिती आचार्य बाळकृष्ण यांनी दिली.
-विविध भाज्यांचाही आम्ही कच्चामाल म्हणून वापर करून भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना संधी देऊ.
- सोबतच, शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करण्यासाठी विदर्भात ठीक ठिकाणी खास कलेक्शन सेंटर उभारू.
-पतंजलीच्या फूड पार्कमध्ये पुढील काही काळात थेटपणे चार ते पाच हजार लोकांना रोजगार मिळेल. तर शेतकऱ्याकडून कच्चामाल खरेदी करण्याच्या प्रक्रियेमध्ये ही चार ते पाच हजार लोकांना रोजगार मिळेल, असा दावा ही आचार्य बाळकृष्ण यांनी केला.
- हा प्रकल्प सुरू करण्यासाठी नऊ वर्षांचा उशीर झाला. त्यामागे अनेक कारण आहेत. मात्र आता आणखी उशीर होऊ देणार नाही, अशी ग्वाही आचार्य बाळकृष्ण यांनी दिली.
हे ही वाचा