Bhagat Singh Koshyari Controvercial Statement : लहान असो की, कुणी मोठा व्यक्ती असो त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) अभ्यास करुनच वक्तव्य करावं; असा टोला राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे विविध कार्यक्रमांसाठी जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. जळगावातील विद्यापीठात जलतरण तलावाचा राज्यपालांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील हेसुद्धा उपस्थित होते. कार्यक्रमानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावर मंत्री पाटील यांना विचारलं असता, ते म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे गुरू आहेत, त्यांना कुणाला गुरू सांगण्याची गरज नाहीये तेच आमचं शक्तिपीठ आहे. तोच आमचा स्वाभिमान आहे, अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत कुणीही मोठ्या पदावरचा तसेच लहान पदावरच्या व्यक्तीनं अभ्यास करूनच वक्तव्य करावं, असा माझा सल्ला असेल, असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यपाल यांना लगावला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर वक्तव्य करण्यापूर्वी ते अभ्यास करूनच करावं, अशी हात जोडून विनंती करतो, असंही मंत्री पाटील यावेळी म्हणाले.
राज्यपालांच्या वक्तव्यानंतर भाजपकडून अद्यापही कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही, यावरही मंत्री पाटील यांना विचारलं असता, "राज्यपाल शेवटी कोणत्याही पक्षाचे नाहीत, त्यामुळे भाजपकडून प्रतिक्रिया आली नसावी. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कुणीही चुकीचं वक्तव्य करू नये, असंही मंत्री पाटील यावेळी म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते राज्यपाल कोश्यारी?
समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. आपल्या देशात गुरुची परंपरा आहे. ज्याला गुरू मिळाला तो यशस्वी होतो असंही कोश्यारी म्हणाले होते. औरंगाबादेत समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्यपाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव, मराठी राजभाषा दिन आणि श्री दास नवमी निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.
माझे शिवरायांवरील वक्तव्य प्राथमिक माहितीच्या आधारे, आता नवीन तथ्य समजलं; राज्यापालांची सारवासारव
समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असं वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आता त्यावर सारवासारव केली आहे. शिवाजी महाराजांच्यावरील आपलं वक्तव्य हे प्राथमिक माहितीच्या आधारे होतं. आता त्यासंबंधी नवीन तथ्य समजलं असल्याचं राज्यपालांनी म्हटलं आहे. ते जळगावात बोलत होते.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यभर संतापाचं वातावरण पसरलं होतं. आता स्पष्टीकरण देताना राज्यपाल म्हणाले की, शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे प्रेरणा स्थान आहेत. समर्थ रामदास हे शिवाजी महाराज यांचे गुरू असल्याची प्राथमिक शिक्षण घेताना मला माहिती मिळाली होती. मात्र आता काही नवीन तथ्य मला सांगण्यात आले आहे. आता तेच पुढे नेण्याचा आपण प्रयत्न करू.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- माझे शिवरायांवरील वक्तव्य प्राथमिक माहितीच्या आधारे, आता नवीन तथ्य समजलं; राज्यापालांची सारवासारव
- 'समर्थांविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल?' राज्यपाल कोश्यारींचं वादग्रस्त वक्तव्य, राष्ट्रवादी आक्रमक
- Governor Controversial Statement LIVE : राज्यपालांचं वादग्रस्त वक्तव्य, शिवप्रेमींमध्ये संताप! वाचा प्रत्येक अपडेट
- शिवप्रेमींमध्ये संताप! राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करावं : खासदार उदयनराजे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha