मुंबई: एक झाकावं तर दुसरं उघडं पडतंय, दुसरं झाकावं तर तिसरंच बाहेर येतंय अशी सगळी गत पूजा खेडकर प्रकरणाची. सेवेत जायच्या आधीच अधिकारपदाचा मिजास, नंतर कागदपत्रांचं गौडबंगाल असे एक नव्हे अनेक कारनामे. एखाद्याने फसवायचंच ठरवलं असेल तर तो संपूर्ण व्यवस्थेला फसवू शकतो, सगळ्यांनाच कसं खुळ्यात काढू शकतो हे पूजा खेडकर प्रकरणामुळे (IAS Pooja Khedkar Case) पुन्हा एकदा स्पष्ट झालं. एखाद्या सराईत गुन्हेगाराला ही लाज वाटावी अशा पद्धतीने पूजा खेडकरने कायद्याची आणि संपूर्ण व्यवस्थेची फसवणूक केली. व्यवस्थेतल्या त्रुटींचा गैरफायदा घेत, सगळे नियम धाब्यावर बसवत पूजा खेडकर आयएएस झाली, पण खोट्याचा आधार घेऊन मिळवलेलं यश फार काळ टिकत नाही. 


'आसमान से गिरा खजूर में अटका' अशी गत पूजा खेडकरची झाली. एवढं कांड केलं आणि चमकोगिरीमध्ये सापडली, पूजाने आता सगळंच गमावलं. पूजा खेडकरचे अनेक कारनामे एकामागून एक बाहेर आले. गेल्या महिन्याभरात पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबीयांचे वेगवेगळे कारनामे पाहून महाराष्ट्रातल्या जनतेवर थक्क होण्याची वेळ आली आहे.आता यूपीएससीने तिचं आयएएस पद काढून घेतलं आणि दिल्ली पोलिस तिला कधीही अटक करू शकतात अशी परिस्थिती आहे. 


आयएएस पद काढून घेतलं


यूपीएससीने एखाद्याचं आयएएस पद काढून घेणं हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण. यासाठी यूपीएससीने गेल्या 15 वर्षांतील, 2009 ते 2015 या दरम्यानच्या सर्व दिव्यांग प्रमाणपत्रांची छानणी केली. यामध्ये 14,999 उमेदवारांचे प्रमाणपत्र योग्य ठरलं आणि एकट्या पूजा खेडकरचे प्रमाणपत्र बनावट निघालं. पूजा खेडकरने कलेक्टर होण्यासाठी यूपीएससीलाही गंडवलं. तिने स्वतःचं नाव तर बदललंच, पण आई-वडिलांच्या स्पेलिंगमध्ये बदल करून फसवणूक केली. त्यामुळेच पूजा खेडकरांनी नेमके किती वेळा परीक्षा दिली हे यूपीएससीलाही समजत नव्हते. 


नाव बदलून अनेकवेळा परीक्षा दिली


पूजा खेडकर प्रकरणासंबंधी UPSC ने 2009 ते 2023 पर्यंत म्हणजेच मागील 15 वर्षात CSE च्या अंतिम शिफारस केलेल्या 15,000 उमेदवारांची माहिती तपासली. त्यामध्ये पूजा खेडकर वगळता इतर कोणत्याही उमेदवाराने यूपीएससीच्या नियमानुसार परीक्षेच्या दिलेल्या प्रयत्नांपेक्षा जास्त प्रयत्न दिल्याचं समोर आलं नाही.


पूजा खेडकरने स्वतःचं नाव बदललं. पूजा दिलीप खेडकर, पूजा दिलीपराव खेडकर, पूजा मनोरमा दिलीप खेडकर अशा विविध नावांनी तिने परीक्षा दिल्या. एका ठिकाणी तिने वडिलांचं नाव हे दिलीपराव खेडकर असं लिहिलं तर त्यानंतरच्या प्रकरणात तिने वडिलांचं नाव दिलीप खेडकर असं नोंदवल्याचं समोर आलं. पुन्हा तिने आईचेही नाव जोडत परीक्षेसाठी नावं नोंदवल्याचं समोर आलं आहे.


UPSC ला शोधता आलं नाही


सातत्याने नाव बदलून परीक्षा दिल्याने पूजा खेडकरांनी नेमकी किती वेळा परीक्षा दिली हे यूपीएससीला शोधता आलं नव्हतं. त्यामुळे ओबीसीतून 9 प्रयत्न संपल्यानंतरही पूजा खेडकरांनी दिव्यांग प्रवर्गातून दोन वेळा परीक्षा दिल्या. 


पूजा खेडकरांनी केलेल्या या बनवेगिरीनंतर असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी यूपीएससीने त्यांची प्रक्रिया अधिक मजबूत करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. 


हजारो प्रमाणपत्रांची सत्यता तपासू शकत नाही


यूपीएससीमध्ये दरवर्षी हजारो, लाखो उमेदवार ओबीसी आणि दिव्यांग (OBC आणि PwBD श्रेणी) प्रवर्गातून परीक्षा देतात. ते प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्याने दिलं आहे की नाही, त्यावरची तारीख, प्रमाणपत्रावर काही ओव्हररायटिंग आहे की नाही याची प्राथमिक छानणी करते, ही सर्व प्रमाणपत्र खरी आहेत की नाही याची सत्यता तपासण्याचे साधन किंवा व्यवस्था यूपीएससीकडे नाही. नेमक्या या गोष्टीचा फायदा पूजा खेडकरने घेतला आणि जिल्हा स्तरावर सक्षम अधिकाऱ्यांकडून बनावट प्रमाणपत्रं मिळवली. 


संपूर्ण व्यवस्थेसोबत फ्रॉड


पूजा खेडकरने संपूर्ण व्यवस्थेसोबत फ्रॉड केला असून एका प्रामाणिक उमेदवाराची संधी हिरावून घेतली आहे. व्यवस्था बदलायची असेल तर आधी व्यवस्थेचा भाग व्हावं लागतं असा विचार करुन आज देशभरातले अनेक तरुण दिवसरात्र एक करुन अभ्यास करतायत, धडपडतात. रिस्टार्ट असं म्हणून नव्याने उभं रहातायत. परिस्थितीशी दोन हात करुन स्वतःला सिद्ध करण्यासाठी रक्ताचं पाणी करतायत. पण पूजाच्या कारनाम्यांकडे पाहिल्यानंतर त्यांच्या मनातल्या दुर्दम्य आशावादाला धक्का बसला नसेल?


लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या प्रशासनाकडे सर्वसामान्य जनता जर संशयाच्या नजरेने पाहू लागली तर या देशाला, या व्यवस्थेला आणि या समाजाला ते कसं परवडेल? काही दिवसांपूर्वी प्रयत्नांची शर्थ करुन आयआरएस होणाऱ्या मनोज शर्मांची यशोगाथा पाहून आपण भारावून गेलो, आज पुजा खेडकरांची कृत्य पाहून हताश व्हायला होतंय. 


ही बातमी वाचा: