मुंबई : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरांचा (IAS Pooja Khedkar)  महाराष्ट्रातील प्रशिक्षण कालावधी संपवण्यात आला असून त्यांना आता मसुरीच्या प्रशिक्षण संस्थेत परत बोलवण्यात आलं आहे. पूजा खेडकरांच्या वर्तनाची आणि कागदपत्रांची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाने (Department of Personnel and Training) एक समिती नेमली असून त्याचा अहवाल दोन आठवड्यात सादर करण्यात येणार आहे. असं असलं तरी बनावट दिव्यांग सर्टिफिकेट सादर केल्याचा आरोप असलेल्या पूजा खेडकरांची दिल्लीतील एम्समधून (Delhi AIMS) वैद्यकीय चाचणी कधी होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच त्यांना अजूनही सेवेतून निलंबित का करण्यात आलं नाही असाही प्रश्न उपस्थित होतोय. पूजा खेडकरांना कार्मिक मंत्रालय पाठीशी घालतंय असा आरोप आता केला जात आहे.


यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड आणि पारदर्शक परीक्षा असलेल्या प्रतिमेचा बुरखा पूजा खेडकर प्रकरणाच्या निमित्ताने टराटरा फाटला आहे. यूपीएससीतील वरिष्ठ स्तरावरही अनेक गोष्टी या मॅनेज केल्या जाऊ शकतात अशी आधी दबक्या आवाजात चर्चा होती, आता त्या गोष्टीला बळ मिळालं आहे. 


खेडकरांच्या कागदपत्रांची चौकशी करण्याचे आदेश


पूजा खेडकरांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलं, त्यांनी खोट्या माहितीच्या आधारे ओबीसी नॉन क्रिमी लेअरचे सर्टिफिकेट मिळवल्याचा आरोप आहे. त्याची चौकशी आता कार्मिक मंत्रालयाच्या समितीकडून करण्यात येणार आहे. 


केंद्राच्या समितीने महाराष्ट्र शासनाशी संपर्क साधला असून राज्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पूजा खेडकरांच्या कागदपत्रांची तपासणी करायचे निर्देश दिले आहेत अशी सूत्रांनी माहिती दिली. पूजा खेडकरांनी त्यांचे ओबीसी आणि दिव्यांग प्रमाणपत्र हे वैध संस्थेतून काढले आहे का याची चौकशी केली जाईल अशी माहिती मिळते. 


पूजा खेडकरांची कागदपत्रं ही खोट्या माहितीच्या आधारे मिळवली याची चौकशी होण्याची शक्यता नाही अशी चर्चा आहे. फक्त कागदपत्रं वैध संस्थेतून मिळालीत की याची तपासणी होत असेल तर पूजा खेडकर यातून अलगद सुटतील. 


दुसरी गोष्ट म्हणजे ही सर्व प्रमाणपत्रं यूपीएससी आणि कार्मिक मंत्रालयाकडे आधीपासूनच आहेत. मग त्याची छानणी का केली जात नाही? 


दिल्ली एम्समध्ये पूजा खेडकरांची वैद्यकीय चाचणी कधी?


पूजा खेडकरांनी यूपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर दिल्ली एम्समध्ये वैद्यकीय चाचणीसाठी येण्यास तब्बल 6 वेळा नकार दिला असे यूपीएससीने म्हटले आहे. त्यांनी खासगी डॉक्टरकडून एमआरआय रिपोर्ट सादर केल्याचंही म्हटलं आहे. पूजा खेडकरांच्या नियुक्तीला यूपीएससी आणि कॅटनेही विरोध केला होता. असं असताना मग यूपीएससी आणि कार्मिक मंत्रालय पूजा खेडकरांना थेट दिल्ली एम्समध्ये पुन्हा एकदा वैद्यकीय चाचणीसाठी का बोलवत नाही असा प्रश्न पडतोय.


सेवेतून तात्पुरतं निलंबन का नाही? 


सेवेत असताना एखाद्या अधिकाऱ्याची चौकशी होत असेल त्याचे निलंबन केलं जातं, जेणेकरुन तपासावर कोणताही दबाव राहणार नाही. पण पूजा खेडकरांच्या बाबतीत हे दिसत नाही. आपल्यावर काय कारवाई केली जाईल याबदलची माहिती पूजा खेडकरांनी पोलिसांना आपल्या घरी बोलवून घेतल्याचं वाशिममध्ये दिसून आलं. 


आता पूजा खेडकरांना मसुरीतील प्रशिक्षण संस्थेत पुन्हा बोलवले आहे. त्यामुळे त्यांची निष्पक्ष चौकशी होईल अशी आशा आहे. परंतु या सर्व प्रकरणाचे मूळ आहे ते पूजा खेडकरांचे बनावट दिव्यांग प्रमाणपत्रक. पूजा खेडकर खरोखरच दिव्यांग आहेत का हे यूपीएससी आणि कार्मिक मंत्रालयाने तपासले पाहिजे. त्यांची केवळ कागदपत्रे न तपासता दिल्लीतील एम्समध्ये वैद्यकीय चाचणी केली पाहिजे. 


पूजा खेडकर दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण


पूजा खेडकर हे प्रकरण गंभीर असून या सर्व प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा निवृत्त न्यायाधिशांच्या माध्यमातून,सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखेखाली झाला पाहिजे अशीही मागणी केली जात आहे. 


पूजा खेडकर हे दुर्मिळातील दुर्मिळ मॅनेज झालेले प्रकरण असल्याची सीनियर आयएएस अधिकाऱ्यांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे यूपीएससीने त्यांच्या विश्वासार्हतेवर उभ्या झालेल्या प्रश्नचिन्हाकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि व्यवस्थेत पुन्हा एकदा कोणती पूजा खेडकर घुसखोरी करणार नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे. 


ही बातमी वाचा :