मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यभरात मिळत असलेल्या मोठ्या प्रतिसादामुळेच कारवाई होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, दिल्लीच्या तख्तापुढे झुकणं आम्हाला माहित नाही अशा शब्दात पवारांनी भाजप सरकारला थेट आव्हान दिलं आहे. माझ्या आयुष्यात गुन्हा दाखल होण्याचा हा दुसरा प्रसंग असल्याचेही शरद पवार यांनी सांगितलं. तर शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी मी 27 तारखेला दुपारी 2 वाजता ईडी कार्यालयात जाणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.

शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी नक्की गुन्हा काय केला ते मला समजून घेतलं पाहिजे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच या घोटाळ्याप्रकरणी अधिकाऱ्यांना सगळी माहिती देणार असून अन्य काही पाहुणचार जर हवा असेल तर त्याची पण माझी तयारी असेल असा टोलाही पवार यांनी सरकारला लगावला. तसेच या प्रकरणी तपास करणाऱ्या सर्व यंत्रणांना मी सहकार्य करणार असल्याचंही पवार म्हणाले.

मी राज्य सहकारी बँकेचा संचालक वा सदस्य कधीच नव्हतो असेही त्यांनी सांगितले. तसेच मी महिनाभर राज्यात निवडणुकीच्या प्रचारासाठी जाणार आहे, त्यामुळे ईडीला माझी गरज लागली तर मी एकदम अदृष्य झालो असं वाटू नये म्हणून ईडीच्या मुंबईतील कार्यालयात दाखल होणार असल्याचे पवारांनी सांगितले. राज्य सहकारी बँक ही महत्वाची बँक आहे. ही बँक सगळ्यांना अर्थसहाय्य देते. सध्या ज्या कालखंडाबाबत चौकशी होतं आहे, त्या संचालक मंडळात कोणत्याही एका पक्षाचे संचालक नव्हते. सर्व पक्षीयसदस्य बँक असल्याचं पवार यांनी सांगितले.

दरम्यान महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील हजारो कोटी रुपयांचा कर्ज वितरणात घोटाळा झाल्याचा आरोप आहे. मुंबई हायकोर्टाने याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते. या निर्देशांनुसार माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सर्वपक्षीय बड्या नेत्यांवर यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल 25 हजार कोटींचा हा घोटाळा असून सुरिंदर अरोरा यांनी याबाबत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यात विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे यांच्यासह 76 मोठ्या नेत्यांवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची व्याप्ती पाहता आरोपींचा आकडा 300च्या घरात जाण्याची शक्यता देखील तक्रारदारांच्या वकिलांनी वर्तवलीय.

'मी कुठल्याच बँकेचा संचालक नव्हतो, गुन्हा दाखल झाल्यास स्वागत'-शरद पवार


महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा




  • महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला तब्बल 1 हजार 500 कोटींचा फटका

  • संचालक मंडळाकडून नाबार्डच्या सूचनांचं उल्लघंन केल्याचा आरोप

  • 9 साखर कारखान्यांना 331 कोटींना कर्जपुरवठा

  • गिरणा, सिंदखेडा करखाना, सूतगिरण्यांना 60 कोटींचं कर्ज

  • केन अग्रो इंडियाची थकहमी रद्द झाल्यानं 119 कोटींचा तोटा

  • 24 साखर कारखान्यांना विनातारण कर्ज, 225 कोटींची थकबाकी

  • 22 कारखान्यांकडील 1995 कोटींचं कर्ज असुरक्षित

  • लघुउद्योगाला दिलेल्या सव्वा तीन कोटींचं नुकसान

  • कर्जवसुलासाठी मालमत्ता विक्रि करुनही 478 कोटींची थकबाकी

  • खासगी पद्धतीने मालमत्ता विक्रि, 37 कोटींचं नुकसान

  • 8 थकवाकीदारांच्या मालमत्ता विक्रित 6 कोटी 12 लाखांता तोटा


कोणावर कितीची जबाबदारी




  • शिवाजीराव नलावडे 34 कोटी

  • राजवर्धन कदमबांडे 25

  • बाळासाहेब सरनाईक 24 कोटी

  • अजित पवार 24 कोटी

  • दिलीपराव देशमुख 23 कोटी

  • जयंत पाटील 22 कोटी

  • तुकाराम दिघोळे 22 कोटी

  • मधुकरराव चव्हाण 21 कोटी

  • आनंदराव आडसूळ 21 कोटी

  • प्रसाद तनपूरे 20 कोटी

  • जगन्नाथ पाटील 20 कोटी

  • गंगाधर कुटुंरकर 20 कोटी

  • मदन पाटील 18 कोटी

  • जयवंतराव आवळे 17 कोटी

  • राजेंद्र शिंगणे 17 कोटी

  • मिनाक्षी पाटील 12 कोटी

  • राहुल मोटे 4 कोटी

  • रजनीताई पाटील 4 कोटी


संबंधित बातम्या-

महाराष्ट्र शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांसह ७६ नेत्यांवर गुन्हा दाखल, शरद पवारही अडचणीत?

'मी कुठल्याच बँकेचा संचालक नव्हतो, गुन्हा दाखल झाल्यास स्वागत'-शरद पवार