नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई उच्च न्यायलायत एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घोटाळ्यामध्ये कुणाची भूमिका काय आहे, याची चौकशी सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.


100 कोटींपेक्षा जास्त रकमेची आर्थिक तक्रार असते, त्यामुळे ईडी यामध्ये हस्तक्षेप करते. त्यामुळे मनी लॉन्ड्रिंगच्या अॅंगलने ईडी चौकशी करत आहे. अशावेळी राज्य सरकारचा हस्तक्षेप राहत नाही. सरकारने कोणावरही सूडबुद्धीने कारवाई केलेली नाही. त्यामुळे शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी कारवाईत राजकारण नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि कायदेशीरित्या ही कारवाई सुरु आहे. सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, जे दोषी नसतील त्यांच्यावर कारवाई होणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.


शरद पवार यांच्यावर चुकीची कारवाई : शशिकांत शिंदे


शरद पवार यांच्यावर झालेली कारवाई चुकीची असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर केली. नवी मुंबईतील माथाडी मेळाव्यातील भाषणात त्यांनी हे वक्तव्य केलं. 80 वर्षाच्या ज्येष्ठ नेत्यावर कारवाई केल्यास त्या विरोधात माथाडी कामगार शांत बसणार नाहीत. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या मैत्रीची आठवण शशिकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना यावेळी करुन दिली.


काय आहे प्रकरण?


महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील हजारो कोटी रुपयांचा कर्ज वितरणात घोटाळा झाल्याचा आरोप आहे. मुंबई हायकोर्टाने याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते. या निर्देशांनुसार माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सर्वपक्षीय बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल 25 हजार कोटींचा हा घोटाळा असून सुरिंदर अरोरा यांनी याबाबत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यात विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे यांच्यासह 70 मोठ्या नेत्यांवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची व्याप्ती पाहता आरोपींचा आकडा 300च्या घरात जाण्याची शक्यता देखील तक्रारदारांच्या वकिलांनी वर्तवलीय.


EXPLAINER VIDEO | शिखर बॅंक घोटाळा आणि महाराष्ट्राचं राजकारण | बातमीच्या पलीकडे | ABP Majha 



संबंधित बातम्या