बीड : गोपीनाथ मुंडे गृहमंत्री असताना त्यांनी मुंबईतील गुंडगिरी आणि गॅंगवॉर संपवलं. त्याचप्रमाणे आपणही बीड जिल्ह्यातील गुंडगिरी संपवली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यापुरती गृहमंत्री म्हणून आपण चांगले काम केले आहे, असे उद्गार राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काढले आहेत.


गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्ताने गोपीनाथ गडावर आयोजित महाआरोग्य शिबिराच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या. या कार्यक्रमात सुरुवातीलाच भाजप आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यातील दादागिरी कशी संपवून टाकली, यावर भाष्य केले होते. हाच धागा धरून पुढे पंकजा मुंडे म्हणाल्या की, मुंडे साहेबांनी गृहमंत्री असताना मुंबईतील गॅंगवॉर आणि गुंडागर्दी संपवली. आपण बीड जिल्ह्यातील गुंडागर्दी संपवली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यापुरते गृहमंत्री म्हणून आपण चांगले काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांनी यावेळी धनंजय मुंडेंवर देखील टीका केली. जे आपला नेता रोज बदलतात, ज्यांच्या रक्तातच बेईमानी आहे, तो मुंडे साहेबांचा वारसदार होऊ शकत नाही, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडेंवर टीका केली. दिवंगत गोपीनाथ मुंडेंना नेते मानतात तर परळीत एकही होर्डिंग का लावलं नाही. एकाला नेता म्हणायचं आणि दुसऱ्याचा फोटो लावायचा, असंही पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या.