Bachchu Kadu on Ministry : बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी मंत्रिपदावरचा दावा सोडला असून मंत्रालय दिल्यामुळे मंत्रिपदाचा दावा सोडत असल्याचं प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी जाहीर केलं आहे. तसेच, लोकसभेसाठीही प्रहार वाटा मागणार असल्याचंही बच्चू कडू यांनी एबीपी माझाशी बोलताना जाहीर केलं आहे.
शिवसेना आणि भाजप यांच्यासोबत एकत्र येण्याची सुरुवात एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून झाली. त्यामुळे आता तुम्हीही भाजप आणि पंतप्रधान मोदींचे मित्र बनला आहात, असं म्हणायचं का? असं विचारल्यावर बच्चू कडू म्हणाले की, आम्ही मित्राचा मित्र आहे. आम्ही थेट मित्र नाही, तर मित्राचे मित्र आहोत, असं बच्चू कडू म्हणाले.
आम्ही NDA सोबत आहोत, असं म्हणता येणार नाही : बच्चू कडू
आम्ही सोबत आहोत, असं नाही. सर्वात आधी एक बैठक होईल. बैठकीनंतर काय निष्कर्ष लागतो, हे पाहावं लागेल. आम्हाला आता बैठकीला आमंत्रित केलं आहे, आता या बैठकीत काय घडतंय त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ, असं बच्चू कडू म्हणाले. आम्ही एनडीए सोबत आहोत, असं म्हणता येणार नाही. आम्हाला आमंत्रण दिल्यामुळे आम्ही इथे आलो आहोत. बैठकीच्या आमंत्रणासाठी पियुष गोयल यांचा फोन आला, तसेच त्यांचं एक पत्रही आलं आहे, भाजप अध्यक्षांनी हे पत्र पाठवलेलं आहे. त्यामुळे सोबत राहायचं म्हटलं तर कसं राहायचं? कुठल्या गोष्टी घेऊन सोबत राहायचं? या सर्व गोष्टींचा निर्णय अद्याप दूर आहे. आता फक्त आम्हाला आमंत्रित केलं म्हणून आलोय, असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.
पाहा व्हिडीओ : मंत्रिपदावरचा दावा सोडतो, बच्चू कडू यांची घोषणा
बच्चू कडू म्हणाले होते, एकनाथ शिंदेंचा गुलाम म्हणून काम करेन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिले त्यामुळे आम्ही आयुष्यभर त्याचे गुलाम राहू. मी मंत्रिपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो पण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर मी माझा निर्णय घेणार आहे. मी 17 तारखेला मुख्यमंत्र्यांना भेटून मग 18 तारखेला माझा निर्णय जाहीर करणार आहे, असं प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी म्हटलं होतं.
बच्चू कडू यांनी अनेकदा मंत्रिमंडळ विस्तार लवकर करण्याची मागणी वेळोवेळी केली होती. त्यातच अजित पवार यांचा गट सत्तेत सहभागी झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र यामुळे आधीपासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत असणाऱ्या आमदारांमध्ये अस्वस्थता वाढली होती. तर बदलत्या राजकारणाला कंटाळून मंत्रिपदाचा दावा सोडणार असल्याचं बच्चू कडू म्हटलं होतं. पण त्यानंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेतला होता.