India Air Force: हवाई दलाच्या विमानानं बुधवारी (26 जुलै) सकाळी एक मानवी हृदय (Human Heart) नागपूरहून (Nagpur) पुण्याला (Pune) पाठवण्यात आलं. हवाई दलाच्या जवानाच्या हृदय प्रत्यारोपणासाठी हे हृदय पुण्याला आणण्यात आलं. त्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. संरक्षण विभागाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात यासंदर्भात ही माहिती देण्यात आली आहे.


पुण्यातील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ-थोरॅसिक सायन्सेस (AICTS) येथे हवाई दलाच्या जवानाचे हृदय प्रत्यारोपण करण्यात आलं. वृत्तसंस्था पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाच्या AN-32 विमानानं हे मानवी हृदय प्रत्यारोपणासाठी नागपूरपासून 700 किमी अंतरावर असलेल्या पुण्यात नेण्यात आलं, जिथे नागरी प्रशासनानं ग्रीन कॉरिडॉर बनवला होता, ज्याद्वारे मानवी हृदय पाठवण्यात आलं. 


वायुसेनेच्या जवानाला ब्रेन डेड महिलेचे हृदय 


एका अधिकाऱ्यानं यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, हृदय नागपूरहून पुण्याला नेण्यासाठीचा उड्डाणाचा वेळ सुमारे 90 मिनिटं होता. झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटरनं जारी केलेल्या एका स्वतंत्र प्रेस रिलीझमध्ये म्हटलं आहे की, हृदय दाता ही 31 वर्षीय महिला होती. तिचे नाव शुभांगी होतं. ही महिला पती आणि दीड वर्षांच्या मुलीसह नागपुरात राहत होती. काही दिवसांपूर्वी शुभांगीला तीव्र डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला. महिलेला 20 जुलै रोजी नागपुरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि नंतर तिच्या मेंदूमध्ये ब्लड क्लॉट्स असल्याचं निदान झालं.  


काही दिवसांनी महिलेला ब्रेन डेड घोषित करण्यात आलं. झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर नागपूरचे समन्वयक दिनेश मंडपे यांनी महिलेच्या कुटुंबीयांशी अवयवदानासाठी संपर्क साधला.






चार जणांना दान करण्यात आले शुभांगी यांचे अवयव 


शुभांगी यांचे पती आणि भावाच्या संमतीनं चार जणांना त्यांचे अवयव दान करण्यात आले. त्यांचे हृदय, यकृत आणि दोन मूत्रपिंड दान करण्यात आले. पुण्यात एक तर नागपुरात तीन अवयव दान करण्यात आले. पुणे स्थित दक्षिणी कमांडने केलेल्या ट्वीटमध्ये एआयसीटीएसनं यशस्वी हृदय प्रत्यारोपण केल्याचं म्हटलं आहे.






ग्रीन कॉरिडॉर का बनवला जातो?


एका ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, डोनर एक गृहिणी होती आणि ज्याला तिचं हृदय देण्यात आलं ती व्यक्ती एक 39 वर्षीय वायुसेनेचा जवान आहे. दक्षिण कमांडच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ग्रीन कॉरिडॉर आयएएफ वाहतूक पोलीस नागपूर आणि पुणे आणि एससी प्रोव्होस्ट युनिटकडून प्रदान करण्यात आला होता. 


अवयव प्रत्यारोपणासाठी जलद वितरण आणि जीव वाचवण्याच्या उद्देशानं ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. यासाठी वाहतूक विभाग अशा प्रकारे वाहतूक व्यवस्थापित करतो की, 60 ते 70 टक्क्यांपेक्षा कमी वेळेत अत्यावश्यक वस्तू किंवा गोष्ट गंतव्यस्थानावर नेली जाऊ शकते.