मुंबई : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


राणा दांम्पत्याचा जामिन रद्द होणार? 


खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना जामीन मंजूर करत असताना कोर्टाने काही अटी घातल्या होत्या. त्या पाळल्या नाही तर जामीन रद्द करु असंही कोर्टने बजावलं होतं. आता रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर राणा दांम्पत्याने जामीनातील अटींचं उल्लंघन केल्याचा आरोप होत आहे. सरकारी वकिल प्रदिप घरत यांनी अटींच उल्लंघन केल्या प्रकरणी राणा दांम्पत्याच्या विरोधात कोर्टात जाणार असल्याचं सांगितलं आहे.  काही व्हीडिओ माझ्य़ाकडे आले आहेत. ते पाहिल्यानंतर न्यायालयाने घातलेल्या अटींचं त्यात उल्लंघन होत असल्याचं घरत यांनी सांगितलं.  


महापालिकेकडून राणांच्या घराची आज तपासणी ?  


मुंबई महापालिकेचे पथक सकाळी 10 नंतर रवी राणा यांच्या खार येथील घरी जाण्याची शक्यता. यापूर्वी पालिकेनं दोनदा तपासणीकरता नोटीस बजावलीय. घर बंद असल्यानं तपासणी झाली नाही. मात्र आता राणा दांपत्य खार येथील घरी पोहोचल्यानंतर शिवसेना विरुद्ध राणा दांपत्याच्या वादाचा दुसरा अंक सुरु होणार. रिपोर्टर- मनश्री


एमआरआय मशिनजवळ फोटो काढला कसा? किशोरी पेडणेकर हॉस्पीटल प्रशासनाला जाब विचारणार


नवनीत राणा यांना लिलावती हॉस्पिटल प्रशासनानं हॉस्पिटलच्या आत व्हिडीओ शुटींग करण्यास परवानगी दिली. इतकंच नाही तर एमआरआय मशिनपर्यंत व्हिडीओ शुट झाले. यामुळे इतर पेशंटची गुप्तता, सुरक्षितता धोक्यात येतेय. असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केलाय. आज किशोरी पेडणेकर लिलावती हॉस्पिटल प्रशासनाला जाब विचारण्यास जाणार आहेत. 


सोमय्या आज संजय राऊतांविरोधात अब्रुनुकसानीची तक्रार दाखल करणार 


किरीट सोमय्या हे आपल्या पत्नी आणि मुलांसहीत मुलुंड पोलीस ठाण्यात जावून, संजय राउत यांच्या विरोधात अब्रू नुकसानीबाबात तक्रार दाखल करणार, त्यानंतर सात दिवसात काही कारवाई झाली नाही तर मुंबई उच्च न्यायालयात याचिका ही दाखल करणार आहेत. सकाळी 11 वाजता ते मुलुंड येथील पोलिस स्टेशन मध्ये जातील.


थकबाकीदार उद्योगपतींमुळे उर्जाविभाग अडचणीत  


वीजबिल थकबाकी संदर्भात ऊर्जा विभागाने राज्यातील अनेक नेत्यांची नावे जाहीर केली. मात्र त्याच सोबत अनेक मोठे उद्योगजग आहेत की त्यांची ही मोठ्या प्रमाणावर ती थकबाकी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही थकबाकी भरली जात नाही. त्यामुळे उर्जा विभाग  अडचणीत आले आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज कोकणातल्या सर्व आमदारांची बैठक


शिवसेनेचं मिशन कोकण, मुख्यमंत्री  उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आज कोकणातल्या सर्व आमदारांची बैठक वर्षा निवास्थानी होणार आहे. या बैठकीत कोकणातील सध्य स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.  


मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचे खास मिशन ऍडमिशन मोहीम 


पालिकेच्या शाळेत नव्या एक लाख विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे लक्ष्य, 15 दिवसात 35 हजार ऍडमिशन मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी खास मोहीम महापालिका शिक्षण विभागाकडून राबवली जात असून मागील महिन्याच्या पंधरा दिवसात 35 हजार विद्यार्थ्यांची प्रवेश झाले आहेत एकच लक्ष्य एक लक्ष मोहिमेला सुरुवात झाली असून जून महिन्यापर्यंत एक लाख विद्यार्थ्यांचे नव्याने प्रवेश महापालिका शाळेत व्हावेत अशा प्रकारचे आव्हान स्वीकारले गेले आहे. आतापर्यंत इंग्रजी महापालिकेच्या शाळेत 13 हजार तर मराठी माध्यमांच्या शाळेत आठ हजार नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. 


मुंबईला कोलकात्याच्या आव्हान, आज रंगणार सामना 


मुंबई आणि कोलकाता यांच्यामध्या आज आयपीएलचा 56 वा सामना रंगणार आहे. नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडिअमवर दोन्ही संघ आमने सामने असणार आहेत. मुंबईचे आयपीएलमधील आव्हान संपले आहे तर कोलकात्याच्या धुसूर आशा जिवंत आहे. मुंबईकडे गमावण्यासाठी काहीच नाही. तर कोलकात्याला विजय गरजेचा आहे. संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. सात वाजता नाणेफेक होणार आहे.