मुंबई : दहावी-बारावी बोर्ड परीक्षा या दोन महिन्यावर आहेत. त्यात बोर्डाच्या तोंडी आणि प्रॅक्टिकल परीक्षा विद्यार्थ्यांच्या नेमक्या कशा घ्याव्यात असा प्रश्न दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना पडला आहे. मागील 6 ते 8 महिन्यापासून एक तर एकही प्रॅक्टिकल शाळांमध्ये झालेले नाही. त्यात अजूनही अनेक शाळांमध्ये 30 ते 40 टक्केच प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. त्यामध्ये प्रॅक्टिकल आणि तोंडी परीक्षाबाबत शिक्षण विभागाने विचार करून सूचना द्याव्यात असे शिक्षकांचे म्हणणे आहे.
यंदाच्या वर्षी दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा दरवर्षीप्रमाणे मार्च एप्रिल महिन्यात होणार आहे. लेखी परीक्षा सुरू होण्यापूर्वी बोर्डाच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा या फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होतील. त्यामुळे उरलेल्या दीड ते दोन महिन्यांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करून प्रॅक्टिकल घेऊन या परीक्षा नेमक्या कशा घ्यायच्या? असा प्रश्न शिक्षकांसमोर आहेत.
दहावीच्या तोंडी प्रात्यक्षिक परीक्षा तारीख 25 फेब्रुवारी ते 14 मार्च अशी आहे. तर बारावी बोर्ड प्रात्यक्षिक तोंडी परीक्षा तारीख 14 फेब्रुवारी ते 3 मार्च अशी आहे. म्हणजेच शिक्षकांसमोर अभ्यासक्रम पूर्ण करणे, सराव परीक्षा घेणे, त्यासोबत प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा घेणे असं भलं मोठं आव्हान असणार आहे. त्यात शाळा अजूनही तीन ते चार तास सुरू आहेत. या परीक्षांचं टेन्शन जसं विद्यार्थ्यांना आहे तसंच परीक्षा घेण्याचे संभ्रम शिक्षकांसमोर आहे.
शाळा सुरू होण्यापूर्वी वर्षभरात एकही प्रॅक्टिकल विद्यार्थ्यांचे झालेले नाही. त्यामुळे प्रॅक्टिकलचा फारसा सराव झालेला नाही. शिवाय अजूनही अनेक अशा शाळा आहेत जिथे फक्त 30 ते 40 टक्केच दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. इतर विद्यार्थ्यांनी अजूनही शाळेत येण्यास संमती पत्र दिले नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घ्याव्यात? गुण कशाच्या आधारावर द्यावेत असा सुद्धा पेच प्रश्न शिक्षकांसमोर आहे.
त्यामुळे एक दीड महिन्यावर आलेल्या बोर्डाच्या परीक्षा पाहता आणि या परीक्षा नेमका कशा घ्याव्यात याबाबत शिक्षकाच्या मनातील संभ्रम शिक्षण विभागाने दूर करण्यासाठी विशेष सूचना देण्याची गरज आहे. जेणेकरून योग्य पद्धतीने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून त्यांना या परीक्षांचे गुण दिले जातील.
संबंधित बातम्या :
- Maharashtra HSC Time Table 2022 : बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जारी; 4 मार्च रोजी पहिला पेपर, पाहा संपूर्ण Time Table
- दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतीनंतरही विलंब शुल्क आकारले जाणार नाही
- Maharashtra HSC SSC Exam : दहावी-बारावीच्या लेखी परीक्षेसाठी आता साडेतीन तासांचा वेळ