Narayan Rane : आमदार नितेश राणे यांच्यावर सुरू असलेल्या अटकेच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. अजित पवारांना ओळखत नाही, भास्कर जाधव नाचे, प्रभूंची औकात काय? असा तुफान हल्ला नारायण राणे यांनी चढवला. आदित्य ठाकरे आणि मांजरीचा संबंध काय असा सवालच राणे यांनी केला. 


सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीचे राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसैनिक संतोष परब याच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आमदार नितेश राणे यांच्यावर नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून त्यांच्या अटकेची कारवाई सुरू असल्याच्या चर्चा आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या कारवाईवरून राज्य सरकारवर टीका केली. सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे. जिल्हा बँक निवडणुकीत आमच्याकडे सत्ता आल्यास त्यांनी केलेले गैरप्रकार उघड होतील. त्या भीतीतून नितेश राणे यांना गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा नारायण राणे यांनी केला. एका आमदारासाठी एवढी मोठी यंत्रणा कामी लावली आहे. एखाद्या दहशतवाद्यासाठी तरी यंत्रणा कामाला लावली होती का, असा मुद्दाही राणे यांनी उपस्थित केला. नितेश राणे हे कुठे आहेत, हे सांगायला मुर्ख वाटलो का, असेही नारायण यांनी म्हटले. अनिल देशमुखही काही दिवस अज्ञातवासात होते, याची आठवणही राणे यांनी करून दिली. 


आदित्य आणि मांजरीचा काय संबंध? राणे यांचा सवाल


आदित्य ठाकरे हे सभागृहात जात असताना नितेश राणे यांनी विधानसभेच्या पायरीवर आंदोलन करताना मांजरीचा आवाज काढला होता. नितेश यांच्या कृतीला नारायण राणे यांनी अप्रत्यक्ष समर्थन केले. आदित्य ठाकरे आणि मांजरीचा काय संबंध असा सवाल त्यांनी केला. मांजरीचा आवाज काढला तर राग का यावा असा उलट सवालही त्यांनी केला. वाघाची मांजर कधी झाली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.


कोण अजित पवार?


कोण अजित पवार त्यांना ओळखतही नसल्याचे म्हणत नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्र्यांवर हल्ला बोल केला. कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांचा संदर्भ देऊ नका असेही राणे यांनी म्हटले. कोकणात पूर, नैसर्गिक वादळ आले तेव्हा अजित पवार कुठे होते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 


भास्कर जाधव तर नाचे, राणेंचा जोरदार हल्ला


पंतप्रधानांवर कोण बोललं तर ऐकून घेणार नाही, नक्कल केली तर सेम उत्तर देऊ, आमच्यातही नकलाकार आहेत, असे नारायण राणे यांनी ठणकावले. भास्कर जाधव हे नाचे असल्याची टीका त्यांनी केली.