परभणी : शिक्षक म्हटलं की अध्यापन. याच अध्यापनातून अनेक पिढ्या घडल्या आहेत. इतरांच्या पाल्यांना घडवणारे अनेक शिक्षक दाम्पत्य आज मात्र स्वतःच्या मुलांना कसे घडवायचे या विवंचनेत आहेत. त्याचे कारणही तेवढेच गंभीर आहे. विविध जिल्ह्यात कुटुंबापासून विभक्त राहून विनाअट काम करणाऱ्या शिक्षक दाम्पत्यांच्या आंतरजिल्हा बदल्या करुन त्यांना त्यांच्या कुटुंबासमवेत राहण्याचा हक्क मिळवून द्यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र शिक्षक पती-पत्नी एकत्रीकरण संघर्ष समितीच्या शिक्षकांसह त्यांच्या पाल्यांनी "होय मी वंचित आहे" हे अनोखे आंदोलन आज केले.


मागच्या अनेक वर्षांपासून राज्यभरातील हजारो शिक्षक दाम्पत्य विविध जिल्ह्यात काम करत आहेत. सध्या कोरोनाचा गंभीर विषय असतानाही हीच परिस्थिती कायम आहे. त्यामुळे या शिक्षक दाम्पत्यांना आपल्या कुटुंबाकडे लक्ष देता येत नाही. वारंवार मागणी करुनही शासन या शिक्षक दाम्पत्यांच्या विनाअट आंतरजिल्हा बदलीबाबत निर्णय घेत नाही. महत्त्वाचे म्हणजे या बदलीसाठी एक अभ्यासगट समितीही गठित केली होती. त्या समितीचा अहवालही शासनाला प्राप्त झाला असताना, यावर कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आज राज्यभरात कार्यरत असलेल्या शिक्षक दाम्पत्याकडून 'होय मी वंचित' या शीर्षकाखाली अनोखे आंदोलन करण्यात येत आहे, ज्यात त्यांच्या मुलांचाही समावेश आहे.



कोरोनाच्या या गंभीर आपत्तीत प्रत्येक जण हा आपल्या कुटुंबाची काळजी घेत आहे. मात्र या आंतरजिल्हा बदलीमुळे राज्यभरात 1200 हून अधिक शिक्षक दाम्पत्य हे त्यांच्या त्यांच्या मुख्यालयी अडकले आहेत. पत्नी एका जिल्ह्यात, पती एका जिल्ह्यात आणि कुटुंब एका जिल्ह्यात अशी परिस्थिती त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम झाला आहे. म्हणूनच या शिक्षक दाम्पत्यांनी शासनाला मागणी करुन तात्काळ या बदल्यांना मान्यता देण्याची मागणी केली आहे.


आज प्रत्येक शिक्षक आणि त्यांचे पाल्य कोरोनामुळे घरीच राहून हातात आपल्या मागण्यांचे फलक घेऊन आंदोलन करत आहेत. अनेक शिक्षकांच्या मुलांनी आपली परिस्थिती मांडणारे व्हिडीओही तयार केले आहेत, जे शासनाला पाठवण्यात येत आहेत.


जांभळे दाम्पत्यांची व्यथा
लातूर जिल्ह्यातील दिलीप जांभळे हे शिक्षक सध्या नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा जिल्हा परिषद शाळेत आहेत. तर त्यांची पत्नी सविता सावंत (जांभळे)या परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमधील इसाद या जिल्हा परिषद या शाळेत शिक्षिका आहेत. त्यांची मुलं, आई-वडील हे लातूरला राहतात आणि हे दोघे वेगवेगळ्या जिल्ह्यात. अशीच प्रत्येक जिल्ह्यात 40 ते 50 शिक्षक दाम्पत्य कार्यरत आहेत ज्यांची हिच अवस्था आहे.