चंद्रपूर : वारंवार घेतले जाणाऱ्या लॉकडाऊनमुळे सामान्य नागरिकांना जरी त्रास होत असला तरी चंद्रपूर जिल्ह्या प्रशासनाने अशा प्रकारच्या लॉकडाऊनमुळे फायदा होत असल्याचा दावा केला आहे. चंद्रपूर शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या पाहता 17 जुलै ते 20 जुलै असा 4 दिवसांचा लॉकडाऊन घेण्यात आला होता. या संपूर्ण काळात दूध सोडल्यास सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकानं देखील बंद होती. गेल्या अनेक महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे त्रस्त असलेल्या लोकांसाठी हा 4 दिवसांचा लॉकडाऊन म्हणजे पुन्हा डोक्याला ताप होता. पण या लॉकडाऊनमुळे नेमके काय फायदे झाले, हे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी लॉकडाऊनबाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या मते या 4 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णांचा डबलिंग रेट कमी झालाय, रुग्ण दुप्पट होण्याचा हा दर आधी 10 दिवस होता. तो आता 14 दिवसांवर आला आहे.



चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही मुख्यतः जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांमुळे वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 90 हजार लोकं हे बाहेरील जिल्ह्यातून दाखल झाले असले तरी यामुळे कोरोनाचे community spreading झालेले नाही. पण अशा प्रकारे बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांचा रोख कायम राहिल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊनच्या काळात ही बाहेरून येणारी संख्या थांबविता आली. याचा ही फायदा पुढील काळात कोरोनाचा अटकाव करण्यात होणार आहे.


लॉकडाऊन दरम्यान प्रशासनाकडून घरोघरी जाऊन लोकांच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या आहेत. आयलाय म्हणजे कोरोना सदृश्य लक्षणं असणाऱ्या लोकांना हुडकून काढणे हे या आरोग्य तपासणी मागे मुख्य उद्देश्य होता. अशा प्रकारच्या 68 केसेस या लॉकडाऊन दरम्यान शोधता आल्या, त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आणि यापैकी 4 जण पॉझिटिव्ह आढळून आले. हे 4 रुग्ण कदाचित कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये देखील सापडले नसते आणि यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असता.


लॉकडाऊनमुळे रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग प्रभावीपणे करता आलं. चंद्रपूर शहरात येण्यास लोकांना मज्जाव असल्यामुळे नवीन रुग्ण दाखल होण्याची शक्यता कमी झाली आणि प्रशासनाला बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणं सोपं झालं. चंद्रपूर शहरात बाधितांच्या संपर्कात आलेल्या अशा जवळपास 500 लोकांच्या अॅन्टीजन टेस्ट करण्यात आल्या. अवघ्या 4 दिवसांत इतक्या मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या चाचण्या शहरासाठी एक विक्रमच म्हणावा लागेल. 4 दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान चंद्रपूर मनपाने विशेष स्वच्छता मोहीम राबवली आणि मनपा कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासण्या देखील केल्या. त्यामुळे लॉकडाऊनचा लोकांना काही प्रमाणात त्रास नक्कीच झाला असेल, पण कोरोनाच्या प्रसाराला अशा प्रकारचे लॉकडाऊन किती आवश्यक आहे, हे यामुळे स्पष्ट झालं आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


नागपुरात पुन्हा लॉकडाऊन? पालकमंत्र्यांनी सर्व खात्यांकडून आराखडा मागवला


सांगलीत आज रात्रीपासून पुन्हा लॉकडाऊन तर उर्वरित ग्रामीण भागात जनता कर्फ्यू