मुंबई : राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या अनेक योजनांसाठी डोमासाईल प्रमाणपत्र (Domacile Certificate) हे अत्यंत महत्त्वाचे असते. प्रत्येक शासकीय कामांसाठी डोमासाईल प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलंय. शासनाकडून अनेक योजना राबवण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शासनाला काही कागदपत्र द्यावी लागतात, त्यामधील महत्त्वाचे हे डोमासाईल प्रमाणपत्र असते. सध्या म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करताना देखील तुमचे डोमासाईल प्रमाणपत्र बंधकारक करण्यात आले आहे.
बऱ्याच जणांना डोमासाईल प्रमाणपत्र कसे काढायचे याविषयी माहिती नसते. पण हल्ली शासनाकडून अनेक प्रमाणपत्र काढण्याच्या प्रक्रिया या घरबसल्या करता येतात. त्यामुळे डोमासाईल प्रमाणपत्र देखील तुम्ही घरबसल्या काढू शकता. त्यासाठी काय प्रक्रिया करावी लागते तसेच त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
डोमासाईल प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करावा?
डोमासाईल प्रमाणपत्र तुम्हाला शासानाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन काढता येऊ शकते. यासाठी तुम्हाला शासनाच्या आपले सरकार https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा लागेल. या वेबसाईटवरुन तुम्ही सर्वात आधी तुमचे रजिस्ट्रेशन करुन घ्यावे. त्यानंतर तुमचे लॉगिन तुम्हाला करता येऊ शकते.
यानंतर तुम्हाला महसूल विभागात जावे लागेल. यामध्ये तुम्हाला विविध पर्याय देण्यात येतील. त्यामधील पहिल्या क्रमांकावर असलेल्या वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र हा पर्याय निवडावा. हा पर्याय निवडल्यानंतर या प्रमाणपत्रांसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची यादी तुम्हाला दिसेल. ही यादी आधी योग्य आणि काळजीपूर्वक तपासून घ्या. त्याप्रमाणे आवश्यक असणारी कागदपत्रे तयार करावीत. त्यांतर खाली क्लिक केल्यानंतर एक फॉर्मचा पर्याय तुम्हाला उपलब्ध होईल. हा फॉर्म तुम्हाला अत्यंत काळजीपूर्वक भरावा लागणार आहे. हे प्रमाणपत्र काढण्यासाठी ऑनलाईन काही शुल्क देखील भरावे लागते. फॉर्म आणि हे शुल्क भरल्यानंतर तुम्ही सबमिट यावर क्लिक करुन तुमची प्रक्रिया पूर्ण करा. अवघ्या 21 दिवसांमध्ये तुम्हाला तुमचे डोमासाईल प्रमाणपत्र घरबसल्या मिळू शकते.
डोमासाईल प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे
हे प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या ओळखीचा पुरावा, भाडे पावती आणि इतर कागदपत्रे, आरीटीचे उतारे, वयाचा पुरावा, रहिवाशी पुरावा यांसंबंधित काही कागदपत्रे आवश्यक असतात. यामध्ये तुमच्या ओळखीच्या पुराव्यांमध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, अर्जदाराचा फोटो आणि स्वाक्षरी, शासकीय किंवा निमशासकीय संस्थांचे ओळखपत्र यांसारख्या गोष्टींचा समावेश करण्यात आलाय. पत्त्याच्या पुराव्यामध्ये तु्म्हाला 10 कागदपत्रांचा पर्याय येतो. यामधील किमान एक तरी पुरावा तुम्हाला द्यावा लागेल. यामध्ये तुम्हाला पासपोर्ट, पाणी बिल, रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, टेलिफोन बिल, ड्रायव्हिंग लायसन्स, मालमत्ता कर पावती आणि 7/12 तसेच 8अ चे उतारे यांचा समावेश करण्यात आलाय.
यासाठी तुम्हाला भाडे पावती आणि इतर कागदपत्रेही द्यावे लागतील. यामध्ये पाणी बिल, रेशन कार्ड, भाडे पावती, मतदार यादी फी, टेलिफोन बिल,वीज बिल, विवाह प्रमाणपत्र, मालमत्ता कर पावती, मालमत्ता नोंदणी शुल्क, पतीची रहिवाशी पुरावा, 7/12 तसेच 8अ चे उतारे यांचा समावेश करण्यात आलाय. यासाठी तुम्हाला आरटीचे उतारे आणि वयाचा पुरावा देखील सादर करावे लागणार आहे. यामध्ये तुम्हाला पाच कागदपत्रांचा पर्याय देण्यात येईल. यामध्ये तुमचे SFC प्रमाणपत्र, बोनाफाईड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचे अधिवास प्रमाणपत्र, प्राथमिक शाळेतील प्रवेशाचा उतारा यांचा पर्याय देण्यात आलाय.
यासाठी तुम्हाला रहिवासी पुरावा देणं देखील बंधनकारक आहे. यासाठी तीन पर्याय देण्यात आले आहेत. त्यातील किमान एक प्रमाणपत्र सादर करावे लागेल. यामध्ये तलाठ्याचा रहिवासी पुरावा, ग्रामसेवकाचा रहिवासी पुरावा, बिल कलेक्टरकडून रहिवासी रहिवासी पुरावा स्वयं घोषणापत्र द्यावे लागेल.