Coronavirus In Maharashtra : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत (Coronavirus Cases) वाढ होत आहे. आजही रविवारी, 31 डिसेंबर रोजी राज्यात 131 नवीन कोरोनाबाधित (Coronavirus Infected) आढळले आहेत. त्यामुळे आता राज्यात सक्रिय कोरोनाबाधितांचा आकडा 701 वर पोहचला आहे. तर, कोरोनाचा नवा व्हेरिएंट जेएन.1 (Coronavirus JN.1 Infection) बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. या व्हेरिएंटचे 29 रुग्ण झाले आहेत.
राज्यात कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण ठाण्यात आहेत. ठाण्यात कोरोनाचे 190 रुग्ण आढळले आहेत, तर मुंबईत आतापर्यंत 137 आणि पुण्यात 126 रुग्णांची पुष्टी झाली आहे. पुण्यात जेएन. 1 व्हेरिएंटचे सर्वाधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. सध्या पुण्यात 15 जेएन. 1 बाधितांची नोंद करण्यात आली आहे.
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी महाराष्ट्रात एक नवीन टास्क फोर्स देखील तयार करण्यात आला आहे, ज्याचे नेतृत्व ICMR चे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर करत आहेत. या टास्क फोर्समध्ये सात सदस्य आहेत. गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.
देशात 841 नवीन कोरोनाबाधितांची नोंद
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना देशात रविवारी, 31 डिसेंबर रोजी 841 प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. मागील सात महिन्यात एकाच दिवसात आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची हा सर्वोच्च आकडा आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, या वर्षी 19 मे पासून देशात एकाच दिवसात कोरोना विषाणूच्या संसर्गाची नोंद झालेली ही सर्वाधिक संख्या आहे. यापूर्वी, 19 मे 2023 रोजी देशात संसर्गाची 865 नवीन प्रकरणे नोंदवली गेली होती. अलिकडच्या काही दिवसांत थंडी आणि कोरोना विषाणूच्या नवीन स्वरूपामुळे संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यापूर्वी, 5 डिसेंबरपर्यंत दैनंदिन प्रकरणांची संख्या दुहेरी आकड्यांवर आली होती.
बिहारमध्ये कोरोनामुळे 10 वर्षाच्या मुलीचा मृत्यू
बिहारमधील (Bihar) सासाराममध्ये कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) असलेल्या 10 वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सासारामचे सिव्हिल सर्जन डॉ. केएन तिवारी यांनी मुलीच्या मृत्यूविषयी माहिती दिली. बिहारमधील लिलारी, नोखा येथे राहणारी ही मुलगी होती. या मुलीवर देहरीच्या जमुहर येथील नारायण मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.
मुलगी गयाच्या शेरघाटी येथे एका नातेवाईकाला भेटायला गेली होती. तिथेच तिची तब्येत बिघडू लागली आणि त्यानंतर तिला जमुहरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तपासणी केली असता तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.