पुणे : कोरोनाच्या साथीने संपूर्ण राज्यात थैमान घातले असताना, कोरोनाच्या उपचारात महत्वाचे योगदान देणाऱ्या ' प्राणवायूची ' चर्चा राज्यात सध्या जोरदार सुरु आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या माहितीनुसार संपूर्ण राज्यात रुग्णांकरिता लागणाऱ्या प्राणवायूची गरज सर्वात अधिक पुणे जिल्ह्याला लागत आहे. संपूर्ण राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात प्राणवायूचा वापर पुणे जिल्हा करीत आहे. बुधवारी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण राज्यात एका दिवसात 953.21 मेट्रिक टनचा वापर केला गेला. यामध्ये एकट्या पुणे जिल्ह्यात 235.400 मेट्रिक टन प्राणवायूचा वापर रुग्णांकरिता करण्यात आला आहे. यावरून पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचार घेत असल्याचे स्पष्ट होत आहे.


राज्याच्या विविध भागातून प्राणवायूचा तुटवड्याच्या तक्रारी सुरुच आहेत. मात्र राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागामार्फत सध्या तरी कोणत्याही प्रकराची टंचाई नसल्याचे सांगण्यात येत आहे. प्राणवायूचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याच्या यादीत पुणे खालोखाल मुंबई शहर 119. 690 मेट्रिक टन, ठाणे/पालघर जिल्हा 67.670 मेट्रिक टन, कोल्हापूर 60 मेट्रिक टन, नाशिक 58.500 मेट्रिक टन, नागपूर 55 मेट्रिक टन, प्राणवायूचा वापर एका दिवसाला करीत आहे.


सगळ्यात कमी प्राणवायूचा वापर करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये, बुलढाणा 1.140 मेट्रिक टन, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी 3 मेट्रिक टन, तर यवतमाळ 4.040 मेट्रिक टन यांचा समावेश आहे.


प्राणवायूचा राज्यात कोणत्याही पद्धतीचा तुटवडा भासू नये म्हणून राज्याचा आरोग्य विभाग आणि अन्न आणि औषध प्रशासन विभाग सगळ्या पद्धतीचे प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे प्राणवायूची उत्पादन क्षमता वाढावी म्हणून सगळे प्रयत्न केले जात आहे. या प्राणवायूच्या वितरणावर लक्ष ठेवण्यासाठी खास राज्यातील विविध जिल्ह्यात नोडल अधिकारी नेमण्यात आले आहे.


संबंधित बातम्या :