मुंबई : आम्ही सत्तास्थापन करु शकत नाही, असे भाजपने राज्यपालांना कळवले आहे. त्यानंतर आता राज्यात शिवसेना सत्तास्थापन करणार का? असा सवाल निर्माण झाला आहे. दरम्यान कालपर्यंत राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री होईल, अशी भूमिका घेणाऱ्या भाजपला शिवसेना नेते संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.
संजय राऊत माध्यमांसमोर म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे नेते कालपर्यंत म्हणत होते की, त्यांचाच मुख्यमंत्री होणार. मग आज त्यांनी सत्तास्थापन करणार नाही, असं राज्यपालांना का सांगितलं? आता राज्याला भाजपचा मुख्यमंत्री कसा मिळणार?
संजय राऊत म्हणाले की, आम्ही सत्तास्थापन करणार नाही आणि शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदही देणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. त्यांची काहीही भूमिका असो, परंतु राज्याला शिवसेनेचाच मुख्यमंत्री मिळणार, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, शिवसेना भाजपसोबत सत्तास्थापन करणार की काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापन करणार? ही बाब संजय राऊत यांनी स्पष्ट केली नाही.
शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले आहेत. तर त्यांच्याकडे 8 अपक्ष आणि इतर पक्षांच्या आमदारांचा पाठिंबा आहे. असे मिळून शिवसेनेकडे 64 आमदारांचे संख्याबळ आहे. राष्ट्रवादीकडे 54 तर काँग्रेसकडे 44 आमदारांचे संख्याबळ आहे. तिन्ही पक्षांकडे मिळून 162 आमदारांचे संख्याबळ आहे. राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी 144 आमदारांची आवश्यकता आहे.
पाहा भाजपची नेमकी भूमिका काय?
मुख्यमंत्रीपदाच्या पालखीत शिवसैनिकाला बसवणार! शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं विधान