वसई : म्हाडा आणि स्थानिक प्रशासनाच्या विरोधात विरारच्या म्हाडाच्या गृहप्रकल्पातील सदनिकाधारकांनी आज एक दिवसीय आंदोलन केलं. या दोघांच्या निष्काळजीपणा आणि दुर्लक्षामुळे होणारे हाल सदनिकाधारकांनी माध्यामासमोर मांडले. म्हाडाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे एकही गोष्टी नसल्याचे यावेळी आंदोलकांनी सांगितले. तर, वारंवार तक्रार करुनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे सदनिकाधारकांचे म्हणणे आहे.
म्हाडाच्या कोकण विभागाने 2014, 2016 आणि 2018 साली विरार बोळींज येथील सदनिकांची सोडत काढली होती. त्यानंतर यशस्वी अर्जदारांना 100% रक्कम भरुन ताबाही देण्यात आला. म्हाडाची सदनिका असल्यामुळे त्यांना चांगल्या सुविधा असतील या भाबड्या आशेपोटी येथील सदनिकाधारकांनी सर्व रक्कम म्हाडाला भरली. सुरुवातीला म्हाडाकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्यामुळे अर्जदारांना खूप मनस्ताप सहन करावा लागला. बऱ्याचवेळा चकरा मारल्यानंतर कामे होत होती. या सर्व दिव्यातून जाऊन म्हाडाने सदनिकांचा प्रत्यक्ष ताबा देण्यास सुरुवात केली. परंतु, बरीच कामे अपूर्ण असल्याची तक्रार येथील सदनिकाधारक करत आहे. विजेची जोडणी, पाण्याची जोडणी, सामायिक सुविधा, कचऱ्याची समस्या इत्यादी समस्या आज ही या संकुलात आहेत. त्याचा मनस्ताप जवळपास दीड हजार सदनिकांधारकांना होत आहे. मूलभूत सुविधांच्या कमतरतेमुळे अजूनही बरेच सदनिकाधारक येथे राहायला यायला तयार नाहीत.


सुविधांची वानवा - 

येथील सदनिकाधारकांनी वेळोवेळी म्हाडाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या या सर्व बाबी निदर्शनास आणून दिल्या. तरही म्हाडाकडून कुठलीही अपेक्षा अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही. म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं होतं, की ऑक्टोबर 2019 पर्यंत महानगरपालिकेची पाण्याची नळ जोडणी होईल. परंतु, आजतागायत ती झाली नाही. येथील नागरिकांना दररोज टँकरच्या पाण्यावर अंवलबून रहावं लागतं, जे पाणी पिण्यालायकच नाही. म्हाडामध्ये 24 तास पाणी पुरवठा होणार म्हणून घरात पाणीसाठवणुकीसाठी पोटमाळा किंवा पाण्याची टाकीच नाही.

निकृष्ट दर्जाचं बांधकाम आणि स्ट्रक्चर -

बांधकाम आणि स्ट्रक्चर निकृष्ट दर्जाचं असल्यानं यंदाच्या पावसाळ्यात निम्म्याहून जास्त फ्लॅटमध्ये लिकेजचे प्रॉब्लेम्स आले होते. म्हाडाच्या ज्या लिफ्ट आहेत त्या वारंवार बंद पडतात. केव्हा केव्हा तर मध्येच बंद होतात त्यामुळे काही वेळा रहिवासी त्यात अडकतात. सदनिकेसाठी म्हाडाने प्रत्येक सदनिकाधारकांकडून दरमहा रुपये 2,100 ते 3,000 प्रमाणे एक वर्षाचा आगाऊ मेंटेनन्स घेतलेलं आहे. तरी देखील रहिवाश्यांच्या मुलभूत सुविधेसाठी म्हाडाने अजूनही कोणतीच तरतूद केली नाही. विक्रीची किंमत जर वेळेत भरली नाही तर म्हाडाकडून 11% व्याजाने पैसे वसूल केले जातात. मात्र म्हाडाने सुविधा देण्यास उशीर केला तर त्याला कोणताही दंड नाही. हा अजब गजब नियामामुळे येथील रहिवाशी आता तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

VIDEO | मुंबईतील डोंगरीमध्ये कोसळलेली 'केसरभाई' इमारत नसून त्यामागचं अनधिकृत बांधकाम कोसळलं : म्हाडा | एबीपी माझा