पुणे : जीएसटीनंतर हॉटेलमधील पदार्थ महागल्याचा अनुभव तुम्हालाही आला असेल. पण आता हॉटेलमधील काही पदार्थ स्वस्त, तर काही पदार्थ महाग होऊ शकतात. कारण सध्याच्या दरांमध्ये व्हॅटचाही समावेश आहे. तो व्हॅट वजा होऊन आता नव्याने दर ठरवण्यात येणार आहेत.

हॉटेलमधील मेन्यू कार्ड आता नव्याने तयार करण्यात येतील. त्यामध्ये पदार्थाची किंमत आणि जीएसटीचाही उल्लेख असेल. सध्या ग्राहकांना पदार्थांच्या किंमतीवर 18 टक्के जीएसटी लावला जात आहे, अशी माहिती पुणे हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

जीएसटी टॅक्स स्लॅबमध्ये नॉन एसी हॉटेलमध्ये 12 टक्के टॅक्स, तर एसीसाठी 18 टक्के टॅक्स द्यावा लागणार आहे. मात्र एखादं हॉटेल एसी आणि नॉन एसी असेल आणि तुम्ही नॉन एसीमध्ये बसून जेवण केलं तरीही 18 टक्केच टॅक्स भरावा लागेल, असंही गणेश शेट्टी यांनी सांगितलं.

समजा,

हॉटेलातील एका मिसळची किंमत 55 रुपये आहे.  55 रुपयांमध्ये 12.5 टक्के व्हॅट आणि 6 टक्के एसी हॉटेलचा सर्विस टॅक्स मिळून कमाल 18.5 टक्के कर होतो. त्यात मालकाचा काही टक्के नफा आधीच जोडलेला आहे.

आता जीएसटीनंतर आधीचा 18.5 टक्के कर वजा करुन 55 रुपये किंमतीच्या मिसळची किंमत 44.83 रुपये होते. या 44.83 रुपये किंमतीवर 18 टक्के जीएसटी कर लावणं अपेक्षित आहे.

जीएसटीनंतर नफा आणि कर लावूनही आत्ताची मिसळ फक्त 52.89 किंवा सरसकट 53 रुपयेच किंमतीची होते. म्हणजेच, जीएसटी लागू होण्याअगोदर 55 रूपयांची मिसळ जीएसटीनंतर 2 रूपयांनी स्वस्त होणं अपेक्षित आहे. पण तसं न होता 55 रुपये एवढीच किंमत ठेवत, त्यावर 18 टक्के जीएसटी जोडण्यात आला आहे.