शिर्डी (अहमदनगर) : महाराष्ट्राच अराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची मादियाळी पंढरपुरात दिसून येत असताना साईबाबांना विठ्ठल स्वरुप माननाऱ्या भाविकांनी शिर्डीत दर्शनासाठी अलोट गर्दी केली आहे. साई मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
साईबाबा संस्थाननेही आषाढी एकादशीचं महत्व लक्षात घेऊन विठ्ठलाची प्रतिमा समाधीवर ठेवून साईबाबांच्या मूर्तीला तुळशीची माळ अणि सुवर्ण आभूषणे चढवली आहेत. एरवी वर्षभर साईबाबांना फुलांची माळ घातली जाते. मात्र फक्त आषाढी एकादशीलाच बाबांना तुळशीची माळ घालण्यात येते.
शिर्डीला येणाऱ्या भाविकांना असलेला उपवासाचा दिवस लक्षात घेऊन साई संस्थानच्या प्रसादालयात आज शाबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.
यंदा 60 हजार भाविकांसाठी 13 टन साबुदाणा खिचडी तयार करण्याच नियोजन संस्थानने केलं. 6 हजार किलो साबुदाणा, 3 हजार किलो शेंगदाणे, 2 हजार किलो बटाटे, 700 किलो वनस्पती तूप, 60 किलो भगर, 300 किलो मिरचीचा वापर करून ही प्रसाद खिचडी तयार करण्यात आली आहे.
दिवसभर साबुदान्याची खिचडी आणि शेंगदाण्याची आमटी हेच जेवण म्हणून देण्यात येते. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज रात्री विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा ठेवून साईंच्या रथाची मिरवणूक काढण्यात येते.