उस्मानाबाद : शहरातील सह्याद्री रूग्णालयाला जिल्हाधिकाऱ्यांनी दहा हजारांचा दंड ठोठावला आहे. त्याशिवाय टेस्टसाठी रूग्णांकडून घेतलेले अतिरिक्त 99 हजार 200 रूपये परत देण्याचे आदेश दिलेत. ह्या खाजगी रुग्णालयाकडून कोविड-19 रुग्णांकडून अँटीजन टेस्टसाठी शासकीय दर 600 रुपये असताना रुग्णांच्या नातेवाईकांकडून दोन हजार रूपये रक्कम घेतली होती. त्याची चौकशी केल्यानंतर ह्या रुग्णालयांने लोकांची फसवणूक केल्याचे उघड झाले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
उस्मानाबाद शहरातील सह्याद्री रुग्णालयाकडून अँटीजन टेस्टसाठी दोन हजार रुपये आकारले जात होते. त्याची तक्रार मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी केली होती. तक्रार आल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सहयाद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल,उस्मानाबाद यांना कारणे दाखवा नोटीस दिली होती. खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. सहयाद्री हॉस्पीटलची प्रशासनाकडून चौकशी करण्यात आली. सह्याद्री मल्टिस्पेशालिटी उस्मानाबाद येथे रॅपिड अँटीजन टेस्ट केलेल्या एकूण-82 रूग्णांची तपासणी करण्यात आली आली. त्यापैकी 73 रुग्णांना रॅपिड अँटीजन टेस्ट करता आकारलेल्या रक्कमेची पावती देण्यात आली होती. तर 9 रुग्णांना पावती देण्यात आलेली नाही. रॅपिड अँटीजन टेस्टची पावती देण्यात आलेल्या 73 रुग्णांपैकी 66 रुग्णांना प्रत्येकी दोन हजार रुपये, 5 रुग्णांना प्रत्येकी रु. 1600 रुपये आणि दोन रुग्णांना प्रत्येकी 1500 रुपये इतकी रक्कम रॅपिड अँटीजेन टेस्टसाठी आकारल्याचे दिसून आले.
शासन निर्णयानुसार रुग्ण स्वतःहून हॉस्पीटलमध्ये कोविड-19 रॅपिड ॲंटीजन तपासणी करण्याकरता आले असेल तर त्याला कमाल 600 रुपये इतका दर आहे. तरीही 73 रूग्णांपैकी 66 रुग्णांकडून प्रत्येकी 1400 रुपये, पाच रुग्णांकडून प्रत्येकी 1000 रुपये व दोन रुग्णांकडून प्रत्येकी 900 रुपये याप्रमाणे एकूण 99,200 रुपये इतकी रक्कम जास्त आकारल्याचे दिसून आले. सह्याद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल, उस्मानाबाद यांनी शासन निर्णयाचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकरांनी सह्याद्री मल्टिस्पेशालिटीला कोविड-19 ची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यास पुढील कालावधीत मनाई केली आहे. पावती दिलेल्या 73 रुग्णांना रॅपिड अँटीजन टेस्टसाठी शासनमान्य दरानुसार 600 रुपये इतक्या रक्कमपेक्षा अधिकची आकारलेली रुग्णनिहाय रक्कम (एकुण रक्कम 99,200रुपये) तसेच पावती न दिलेल्या 9 रुग्णांना रॅपिड अँटीजेन टेस्टसाठी शासनमान्य दरानुसार 600 रुपये इतक्या रक्कमपेक्षा अधिकची आकारलेली रुग्णनिहाय रक्कम त्या त्या रुग्णाच्या (एकुण 82 रुग्ण) बँक खात्यावर या आदेशाच्या दिनांकापासून 8 दिवसांचे आत जमा करण्याचे आदेश दिले आहे. अँटीजेन टेस्ट केलेल्या 9 रुग्णांना पावती दिली नसल्याचे दिसून आले असून त्यामुळे त्यांनी भारतीय साथरोग अधिनियम 1897, महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम 2020 व शासन निर्णयातील तरतुदींचे उल्लंघन केले आहे. या उल्लंघनाकरिता सह्याद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटला १० हजारांचा दंड केला आहे.
महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ काही खाजगी रुग्णालयांमार्फत उपलब्ध करुन देण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातही डेडीकेटेड कोविड हॉस्पीटलमध्ये तसेच सर्व अंगीकृत खाजगी रुग्णालयांमध्ये कोविड-19 चा उपचार घेणा-या रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. खाजगी प्रयोगशाळांनी कोविड-19 साठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थेने मान्यता प्रदान केलेल्या उत्पादकांच्या रॅपीड अॅन्टी बॉडी टेस्ट व रॅपीड अॅन्टीजेन टेस्ट वापरणे बंधनकारक आहे. त्यासाठीचे कमाल दर निश्चित करण्यात आलेले आहेत. राज्यातील कोणत्याही प्रयोगशाळेला या दरांपेक्षा अधिक दर आकारता येत नाही. नाहीत. रॅपीड अॅन्टीजेन टेस्टचा दर सर्व करांसहित 600 रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे.