मुंबई : कोरोनाबाधीत रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पध्दतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी (200 मि.ली.) खाजगी, विश्वस्त रक्तपेढ्या, रुग्णालयांना रुग्णाकडून साडेपाच हजार इतका कमाल दर आकारण्यास मान्यता दिली आहे. यापेक्षा अधिक दर आकारल्यास त्यांनी आकारलेल्या अतिरिक्त रक्कमेची परतफेड संबधित रुग्णांना करणे बंधनकारक असणार आहे. तसेच परतफेड न केल्यास संबंधित रक्त पेढीचा परवाना रद्द करण्याबाबतची कारवाई संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत करण्यात येईल,असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.


राज्यात सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधीतांवर ट्रायल बेसिसवर निशुल्क प्लाझ्मा थेरेपी उपचार पध्दती वापरण्यात येत आहे. केंद्र शासन व सेंट्रल ड्रग स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशने ऑफ लेबल प्लाझ्मा थेरेपी वापरण्याच्या मार्गदर्शक सूचना दिल्यानंतर प्लाझ्माफेरॅसिस पध्दतीने संकलित करण्यात आलेल्या कॉन्व्हॅलेसंट प्लाझ्मा (ऑफ लेबल) वापरण्यासाठी खाजगी व विश्वस्त रक्तपेढ्यांकडून प्लाझ्मा थेरेपीसाठी आवश्यक प्लाझ्मा बॅगसाठी अवाजवी शुल्क आकारले जात असल्याचे निदर्शनास आले. रुग्णांना किफायतशीर दरात हा प्लाझ्मा उपलब्ध करुन देण्यासाठी या प्लाझ्माचा प्रती डोसची किंमत निश्चित करण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदे मार्फत तज्ञ समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीने प्लाझ्मा अफेरॅसिस पध्दतीने प्लाझ्मा संकलित करण्यासाठी लागणारे खर्च व राष्ट्रीय रक्त धोरणानुसार निश्चित केलेलल्या रक्तावरील अतिरिक्त चाचण्या विशेष चाचण्या यासाठी आकरण्यात येणाऱ्या सेवा शुल्क हे लक्षात घेऊन दर निश्चिती केलेली आहे.


त्यानुसार प्लाझ्मा बॅग (200 मिली) 5500 रुपये आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे. नॅट चाचणीसह प्लाझ्मा बॅग उपलब्ध करुन दिल्यास या चाचणीसाठी कमाल दर 1200 रुपये प्रति चाचणी (प्लाझ्मा बॅगेच्या किंमतीव्यतिरक्त) तर केमील्युमीनेसन्स तपासणी करुन प्लाझ्मा बॅग दिल्यास त्यासाठी प्रति चाचणी कमाल दर 500 रुपये (प्लाझ्मा बॅग किंमती व्यतिरक्त) आकारण्यास मान्यता दिली आहे.