पंढरपूर - विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तास्थापनेसाठी घोडेबाजारावरुन आरोपांच्या फैरी झडत आहे. अशातच अकलूजमध्ये मात्र खराखुरा घोडेबाजार फुलाला आहे. येथील रुद्र आणि संकरा या अश्वांना प्रत्येकी 50-50 लाखांची मागणी आली आहे. कार्तिक यात्रेनंतर अकलूजमधील घोडेबाजार हा आता देशातील मुख्य घोडेबाजारात गणला जाऊ लागला आहे. सध्या देशभरातून अडीच हजार दर्जेदार अश्व या बाजारात दाखल झाले आहेत. पहिल्या आठ दिवसातच या बाजारात जवळपास 5 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.


राज्यातील सत्तास्थापनेसाठी घोडेबाजार होईल की नाही माहीत नाही. पण, अकलूजचा घोडेबाजार नक्कीच बहरलाय. या बाजारात रुद्र आणि संकर या अश्वांना या बाजारात 50 लाख रुपयाची मागणी होऊनही विक्री झालेली नाही. राज्यभर जास्त पाऊस काळ झाल्याने यावर्षी अकलूज येथील घोडेबाजार विक्रमी भरला आहे. उद्घाटनापूर्वीच 100 घोड्यांच्या विक्रीमुळे यंदाचा बाजार विक्रमी ठरणार आहे.

अकलूज बाजारात उंच्च किमतीच्या दर्जेदार घोड्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने खास अकलूज बाजारासाठी अनेक व्यापारी ठेवणीतले घोडे विक्रीस आणत असतात. बाजारात राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, दिल्ली या भागातील जवळपास 90 ते 100 व्यापारी आपले घोडे घेऊन दाखल झाले आहेत. अजूनही घोड्यांच्या गाड्या मोठ्या संख्येनं दाखल होत आहेत. या बाजारात 50 हजारांपासून 50 लाखापर्यंत घोड्यांच्या किमती असून यात पंचकल्याणी, नुखरा, अबलख, काटेवाडी, पंजाबी, मारवाड, सिंध अशा विविध प्रकारच्या अश्वांना पाहण्यासाठी देशभरातून खरेदीदार आणि घोडे शौकीन मोठ्या प्रमाणात दाखल होऊ लागले आहेत.

यात 6 महिन्यापासून 1 वर्षापर्यंतच्या दर्जेदार घोड्यांच्या पिल्लांची किंमत सध्या जास्त असली तरी त्यांनाच मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे. घोड्यांच्या अंगातील जन्मजात असलेले रूप, स्वभाव, शुभ गुण आणि खुणा यावर घोड्यांच्या किमती असल्या तरी त्याची चाल, रपेट, नाचकाम, रुबाबदारपणा याचीही पाहणी खरेदीदार करून त्याची किंमत ठरावीत असतात. यासाठी बाजारतळावर सध्या घोड्ंयाना हलगीच्या तालावर नाचकाम शिकवणे आणि त्याची प्रात्यक्षिके करणे सुरु आहे. घोड्याची ऐटबाज चाल आणि धावण्याची पद्धत याचीही प्रात्यक्षिके खरेदीदारांच्या समोर केली जात आहेत. त्यानंतर घोड्यांची विक्री होत आहे. घोडेबाजारात घोड्यांच्या विक्रमी किमती आणि विक्रीमुळे आयकर खात्याच्या चौकशीला सामोरे जावे लागत असल्याने घोडे व्यापारी उघड बोलण्यास तयार नसले तरी अकलूज बाजारात अनेक घोड्यांची किंमत 50 लाखांच्या पेक्षा जास्त असल्याचे खारेदारांकडून सांगण्यात येत आहे .

सध्या रुद्र हा पंजाबी पांढऱ्या अश्वाला 50 लाखांची मागणी होत असूनही व्यापाऱ्यांला जास्त अपेक्षा असल्याने अजूनही त्याची विक्री झालेली नाही. याच पद्धतीने मारवाड जातीचा संकरा, राणा अशा अस्वानही 50 लाखांची मागणी होत आहे. या बाजारातील रुद्रा आणि संकरा या अश्वांना पाहण्यासाठीही खरेदीदार गर्दी करीत असून याच्यासोबत फोटो काढण्यासाठी धडपडत आहेत. रुद्र हा 5 वर्षाचा तगादा अश्व आहे. याची उंची 68 इंच एवढी आहे. याच पद्धतीने काळाभोर मारवाड जातीचा संकरा हा देखील या बाजाराचे आकर्षण ठरले आहे. सध्या या अश्वांची चाल, नाचकाम, रपेट, मंद चाल, द्रुत चाल याच्या स्पर्धा सुरु झाल्या आहेत.

या स्पर्धेतील घोड्यांच्या दर्जावरुन त्यांच्या किमती व्यापारी ठरवू लागले आहेत. सध्या या बाजारात घोडे शौकिनांसोबत बडे बागायतदार शेतकरी आणि फक्त व्यवसायासाठी घोडे वापरणारे खरेदीदार दाखल झाले आहेत. लग्नकार्यात नाचकामासाठी घोडे घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सध्याच्या घोडे विक्रीचा वेग पाहता यंदा अकलूज बाजाराची उलाढाल 10 कोटींचा आकडा नक्की ओलांडणार आहे. येत्या काही दिवसांत रुद्रा आणि संकरा अशा अश्वांना किती किंमत आली हेही समोर येणार असले तरी या बाजारात एखाद्या अश्वाला 50 लाखाची मागणी येऊनही विक्री न झाल्याची ही पहिलीच घटना ठरली आहे.