दुसरीकडे महाशिवआघाडीबाबत बोलण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नकार दिला आहे. याबाबत शिवसेनेकडून अद्याप कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली आहे. तर भाजपसोबत युती करण्यास शिवसेना आमदार उत्सुक नाहीत, मात्र आघाडीसोबत जाण्यास अनुकुल आहेत, अशी माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. सरकार स्थापनेत भाजप अपयशी झाल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत शिवसेना वाटाघाटीच्या सूत्रावर चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, आज रात्री नऊ वाजता पुन्हा कॉंग्रेसची बैठक होणार आहे. भाजपला सत्तेपासून लांब ठेवणे हे प्राधान्य हे मत आमदारांनी व्यक्त केलं असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेला कॉंग्रेसला पाठिंबा देऊ नये, असे म्हटले आहे. सत्तास्थापनेच्या या गोंधळात कॉंग्रेसने पडू नये, शिवसेनेला पाठिंबा देणे हे दोघांच्याही फायद्याचे नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
मात्र जर राज्यपालांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तास्थापन करण्यासाठी बोलवलं आणि त्यावेळी जर शिवसेनेनं पाठिंबा दिला तर काँग्रेस याबाबत विचार करेल, असे मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे. तर भाजपनं सत्तास्थापनेचा दावा केल्यास त्यांच्या विरोधात मतदान करु आणि ज्यावेळी सरकार कोसळेल त्यावेळी पर्यायी सरकार देण्याचा आम्ही प्रयत्न करु, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात महाशिवआघाडीचं समीकरण होऊन सरकार निर्माण होणार का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. त्याला कारण देखील तसंच आहे. एकीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीचं कौतुक केलं तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही भाजप सत्तास्थापनेत अपयशी ठरल्यास आघाडीही सत्तास्थापनेचा विचार करु शकते असे संकेत दिले होते तर त्यातच आज काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनीही आज अशीच भूमिका मांडल्यानं महाराष्ट्रात महाशिवआघाडीचं सरकार होणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी नेहमी महाराष्ट्राच्या हिताचा विचार केल्याची स्तुतीसुमनं संजय राऊत यांनी उधळली आहेत. बेळगाव-कारवारप्रश्नी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेचं कौतुकही केलं आहे. त्यामुळे महाशिवआघाडीचं सरकार स्थापन होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.