उस्मानाबाद : राज्यातील होमगार्ड अर्थात गृहरक्षक संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्य सरकारने होमगार्डचं 208 कोटी रुपयांचं मानधन थकवल्याने होमगार्ड आक्रमक झाले आहेत. तरी, राज्यात एकूण 45 हजार होमगार्ड्स आहेत आणि त्यांना वर्षाला 180 दिवसांचं काम देणं बंधनकारक आहे. मात्र, सरकारकडे होमगार्डचं मानधन द्यायला पैसे नसल्याने त्यांना काम देऊ नका, असं सरकारने म्हटलं आहे. त्यामुळे संतापलेल्या आणि हतबल होमगार्डनी जिल्ह्याजिल्ह्यात आंदोलनाचा इशारा दिला आहे.


होमगार्डची निवड कशी होते?
होमगार्ड दलातील स्वयंसेवकांची निवड ही मुख्यतः पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या निवड-निकषांवर आधारित असते. त्यामुळे महिला-होमगार्डची निवड त्या नियमानुसार होते. ही निवड गृहरक्षक दल भरती समितीद्वारा वर्षातून दोनदा करण्यात येते. उमेदवारांची निवड जिल्हा पातळीवर होते. निवड झालेल्या गृहरक्षकांना विशेष प्रतिज्ञा घ्यावी लागते. निवड झालेल्या उमेदवारांना गृहरक्षक म्हणून नेमण्यात येऊन त्यांना स्थानिक स्तरावर विशिष्ट पोलिस ठाण्याशी संलग्न करण्यात येते. संबंधित जिल्ह्याची लोकसंख्या आणि आकारमानानुसार प्रत्येक जिल्ह्यात तीन ते चार हजार गृहरक्षकांची नेमणूक करण्यात येते. गृहरक्षकांचे निवृत्तीचे वय साधारणतः ५५ वर्षे असते. जे गृहरक्षक-स्वयंसेवक तीन वर्षे गृहरक्षक म्हणून कामगिरी बजावतात, त्यांना पोलिस दल, अग्निशमन दल, राज्य राखीव दल इत्यादी मधील निवडप्रसंगी पाच टक्के आरक्षणाचा नियम असून त्याचा फायदा प्रशिक्षित गृहरक्षक वेळोवेळी घेत असतात. पुरुष आणि महिला गृहरक्षकांना पोलिसांच्या धर्तीवर पोशाख-गणवेश दिले जातात. याशिवाय गृहरक्षकांना ते प्रत्यक्ष कामावर असताना दररोज रु. ४०० एकत्रित भत्ता दिला जातो


होमगार्डची कामं


1. पोलिस दलाला सहाय्यकारी म्हणून काम करणे.


2. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत करणे.


3. नैसर्गिक संकट वा विमानहल्ला इत्यादी आपत्तींच्या प्रसंगी आपत्ती निवारणाच्या कामी मदत करणे.


4. अपघात किंवा तत्सम संकटाच्या वेळी गरजूंना प्रथमोपचार आणि रक्त देणे, रुग्णवाहिकेची सेवा पुरवणे, यांसारखी कामे करणे.


5. संपकाळात किंवा अन्य कारणाने दैनंदिन आणि रोजचे कामकाज बंद पडले असता विविध आवश्यक सेवा चालू ठेवण्याच्या दृष्टीने वाहतूक नियंत्रण, दळणवळण-संवाद, वीज पुरवठा, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा यांसारख्या अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यास मदत करणे.


6. समाजकल्याणविषयक कामांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सरकारला मदत करणे.


7. राज्य शासन अथवा राज्याच्या गृहरक्षक महासमादेशकांकडून गृहरक्षक दलाकडे सोपवलेल्या कामांची अंमलबजावणी करणे.


8. आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीला पायबंद घालण्यासाठी कार्यरत असणाऱ्या सीमा सुरक्षा दलाला प्रसंगोपात्त मदत करणे इत्यादी.