Amit Shah In Pune : आगामी निवडणूकासांठी देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी अहमदनगरचा दौरा केल्यानंतर आज (रविवारी) शाह पुण्यात होते. दरम्यान पुण्यातील दौऱ्यादरम्यान शाह यांनी भाषणातून तुफान फटकेबाजी करत महाविकास आघाडी सरकावर हल्लाबोल चढवला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसह राज्य सरकारवर हल्लाबोल केला. 


यावेळी राजकीय टीकांसह सामान्यांच्या दृष्टीनेही एक महत्त्वाचं विधान शाह यांनी केलं. 'केंद्र सरकारने पेट्रोलचे दर 15 रुपयांनी कमी केले, पण महाराष्ट्र सरकारने याबाबत काही पावलं न उचलता दारुचे दर कमी केले,' अशी टीका करत 'महाराष्ट्राला दारु स्वस्त नकोय, पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करणे गरजेचे आहे' असंही म्हटलं.


'उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी विश्वासघात केला'


अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी विश्वासघात केला, असं विधान केलं. यावेळी अमित शाह यांनी राज्यातील सरकारवर चौफेर टीका केली. शिवसेनेवर निशाणा साधताना 2019 च्या निवडणुकीत भाजपसोबत शिवसेनेनं विश्वासघात केल्याचा आरोपही लगावला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे मातोश्रीवरील बैठकीत ठरलं होतं. मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेनं हिंदुत्व बाजूला ठेवलं आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून 2019 मध्ये भाजपसोबत विश्वासघात केला. सत्तेतून पायउतार व्हा आणि मग मैदानात उतरुन दोन - दोन हात करु. जनता कुणाला कौल देते हे पाहूयात. तिन्ही पक्षाने एकत्र लढून भाजपला हरवून दाखवावे, असं आव्हान केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिलं. 



महत्त्वाच्या बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha