Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) पुणे दौऱ्यावर (Pune) आहेत. अमित शाहांनी पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेऊन दर्शनाला सुरुवात केलीय. पुणे महापालिकेकडून अमित शहांच्या दौऱ्याची पूर्ण तयारी करण्यात आली. पुणे महापालिकेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन अमित शाह यांच्या हस्ते केलं जाणार आहे. दरम्यान, अमित शाह यांच्या हस्ते आज पुणे महापालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचंही अमित शाह यांच्या हस्ते भूमिपुजन झालंय. यावेळी अमित शाह यांनी बाबासाहेबांचं संघर्ष आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यावर भाष्य केलंय. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भूमिपुजनासाठी आयोजित कार्यक्रमात आमित शाह म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तरुणांना प्रेरणा देत राहील. ज्यावेळी स्वराज्य आणि स्वधर्म हे शब्द उच्चारणे अवघड होते, तेव्हा शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवाजी महाराजांनी न्याय, समाजकल्याण, आत्मरक्षा, आणि पहिले नौदल उभारण्याचे काम केलं. शिवाजीमहाराजांच्या नंतरही स्वराज्याचे कार्य त्यांच्या प्रेरणेनं सुरु ठेवलं", असंही अमित शाह यांनी म्हटलंय.  

तसेच "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर अपमान, अन्याय, कटुता सहन केली. परंतु, त्यांनी संविधान तयार करताना कुठेही कटुता येऊ दिली नाही. बाबासाहेबांना त्यांच्या आयुष्यात आणि मृत्युनंतर देखील अपमानित करण्याची कॉंग्रेसनं एकही संधी सोडली नाही. बाबासाहेबांना भारतरत्न बिगर कॉंग्रेस सरकार आल्यावर दिलं गेलं. नरेंद्र मोदींनी संविधान दिवस साजरा करण्यास सुरुवात केल्यावर कॉंग्रेसनं त्यावर बहिष्कार टाकला. बाबासाहेब संसदेत पोहचणार नाहीत यासाठी प्रयत्न केले. बाबासाहेबांचे संविधान राबवण्यासाठी आम्हाला कॉंग्रेसची भिती नाही", असं अमित शाहा बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी आले असताना म्हणाले आहेत. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. काल (शनिवारी) ते अहमदनगरमध्ये होते. प्रवरानगर येथे राज्‍यस्‍तरीय सहकार परिषदेचे आयोजन करण्‍यात आले होते. यापूर्वी नोव्हेंबरमध्ये अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा नियोजित करण्यात आला होता. मात्र, तो अचानक रद्द करण्यात आला होता. त्यानंतर आता 18 आणि 19 डिसेंबर असे दोन दिवस ते नगर आणि पुणे जिल्ह्यांचा दौरा करीत आहेत. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha