Holi 2023 Maharashtra : राज्यासह देशभरात धुळवडीचा उत्साह (Holi Celebration) दिसून आला. अनेक ठिकाणी पांरपरीकपणे धुळवड साजरी करण्यात आली. तर, शहरी भागात रंगांची उधळण करत डीजेच्या तालावर आज रंगाचा सण साजरा करण्यात आला. एरवी, राजकीय शिमगा करणाऱ्या राजकीय मंडळींनीदेखील आज धुळवडीचा आनंद लुटला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राजकीय नेत्यांनीदेखील धुळवड साजरी केली. कायदा आणि सुव्यवस्थेला गालबोट लागू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ठाणे निवासस्थानी धुळवड साजरी केली. यावेळी त्यांचे कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरक्षा बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनाही शुभेच्छा दिल्या. भाजप महाराष्ट्राचे उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी सन अँड सन्स या जुहू चौपाटी परिसरात असणाऱ्या हॉटेलमध्ये धूळवड साजरी केली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते.
जालनामध्ये अनोखा प्रथा
जालना येथे धुलीवंदनाच्या निमित्ताने 134 वर्षांची परंपरा असलेली 'हत्ती रिसाला' मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत प्रतिकात्मक लोखंडी हत्तीची बैलगाडी मध्ये मिरवणूक काढली जाते. या हत्तीवर वंश परंपरेने एका व्यक्तीला राजा म्हणून बसवले जाते. हा राजा याच हत्तीवर बसून लोकांना रेवड्या वाटतो. दरम्यान ही मिरवणूक ज्या भागातून जाते त्या ठिकाणी रंग खेळणे बंद करण्यात येत. गेल्या 134 वर्षांपासून हा संकेत पाळला जातो. निझाम राजवटीपासून ही प्रथा रूढ झाल्याचा इतिहास सांगितला जातो.
धुलीवंदनला जावयाची गाढवावरून जंगी मिरवणूक
बीडमध्ये जावयाला चक्क गाढवावर बसवून त्याची गावभर मिरवणूक काढली जाते. बीड जिल्ह्यातील विडा गावात ही परंपरा जपली जाते. विडा गावात 150 घरजावई कायमस्वरुपी वास्तव्यास आहेत. धुलीवंदनाच्या दोन दिवस अगोदर जावई शोधण्याची मोहीम गावकरी हाती घेतात. बरेच जावई गावकऱ्यांच्या सापळ्यातून निसटूनही जातात. कोणता जावई कुठे आहे याचा तपास करण्यासाठी गावात पथकही नेमले जातं. यावर्षी 19 जणांच्या पथकाने जावयाचा शोध घेतला आणि केज तालुक्यातल्या जवळबन येथील अविनाश करपे यांना यावर्षी गाढवावर बसण्याचा मान मिळाला आहे.
कोकणात शिमगोत्सव
कोकणात पांरपरिक पद्धतीने होळी-शिमगा उत्सव साजरा करण्यात आला. देवाच्या पालख्या नाचवण्यात आल्या. यामध्ये ग्रामस्थांनी सहभाग घेतला. देवाच्या पालखीत देवाचे मुखवटे असतात. फक्त पालखीच्या वेळी देवळातून हे मुखवटे बाहेर काढले जातात. पालखी घरोघरी जाते आणि त्याचे पूजन केले जाते. आगामी काही दिवस पारंपरिक पद्धतीने कोकणात शिमगा साजरा केला जातो.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील वरळीतल्या कोळीवाड्याला भेट दिली. कोळीवाड्यात पारंपरीक पद्धतीने होळी साजरी केली जाते. यावेळी कोळी बांधवामधील उत्साह पाहण्यासारखा असतो. आदित्य ठाकरेंनी स्थानिक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. वरळी कोळीवाड्यात होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. प्रत्येक चौकात होळी पेटवली जाते. यावेळी आदित्य यांनी पारंपरिक वाद्यावर ठेकाही धरला होता.
मांसाहारावर ताव
धुळवडीनिमित्ताने मटण, कोंबडीवर अनेकांनी ताव मारला. मटण घेण्याबरोबरच फिश आणि चिकन घेण्यासाठी देखील नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.
धुळवड खेळून रंग धुण्यासाठी गेलेल्या एकाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू
धुळवड खेळून रंग धुण्यासाठी गेलेल्या एकाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. जयदीप पाटील अस मृत्यु झालेल्या युवकाचे नाव आहे. सात ते आठ जणांचा ग्रुप धुळवड खेळून झाल्यानंतर रंग धुण्यासाठी मावळ मधील वराळे गावामधील इंद्रायणी नदी परिसरात गेले होते. त्यावेळी मयत जयदीप आणि त्याचे काही मित्र रंग धुण्यासाठी पाण्यात उतरले असता नदीच्या खोलीचा अंदाज न आल्याने जयदीप पाटील यांचा नदीत बुडून मृत्यू झाला. वराळेमधील डॉ डी.वाय. पाटील महाविद्यालयात हे सर्व विद्यार्थी शिक्षण घेत होते. तर मयत विद्यार्थी जयदीप पाटील हा मूळचा जळगाव जिल्ह्यातील तारखेड गावातील रहिवासी आहे.