Nashik News : नाशिक (Nashik) शहरात जिल्ह्याला लाचखोरीने अक्षरश पोखरून काढले असल्याचे चित्र दिसत आहे. लहान कर्मचाऱ्यापासून ते क्लास वन अधिकाऱ्यांपर्यत लाच घेण्याच्या घटना समोर आल्या आहेत. मार्च महिन्यातील मागील सहा दिवसाची आकडेवारी बघता चार लाचखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे. आज निफाड (Niphad) तालुक्यातील दावचवाडी येथील तलाठ्यास लाच घेताना ताब्यात घेतले आहे. 


नाशिकसह (Nashik) विभागात लाचखोरीच्या (Bribe) घटनांना ऊत आला आहे. बहुतांश घटनांत सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयांमध्ये भ्रष्टाचाराची कीड मोठ्या प्रमाणात पसरल्याचे चित्र आहे. हे सातत्याने लाचखोरीच्या घटनांनी अधोरेखित होत आहे. दरम्यान जमिनीचा सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना तलाठ्यास (Talathi) रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. महेश सहदेव गायकवाड असे या तलाठ्याने नाव आहे. 


लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांची आत्या हिने तक्रारदार तसेच त्यांचे वडील यांच्या नावे निफाड तालुक्यातील मौजे नागापूर येथील शेती मृत्युपत्र करून लिहून दिली होती. या मृत्युपत्राच्या आधारे निफाडच्या दुय्यम निबंधकाकडे दस्त नोंदणी केली होती. त्या अनुषंगाने दावचवाडीचे तलाठी यांच्याकडे सातबारा नोंदी करण्यासाठी अर्ज केला होता. नाव नोंदणीसाठी तलाठी गायकवाड याने पाच हजारांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदार याने रीतसर एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने तपास करून लाचेची खात्री करत सापळा रचला. यानुसार पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना तलाठ्यास रंगेहाथ पकडण्यात आले. 


 


सरकारी कार्यालयं लाचखोरीची केंद्र झाल्याचा आरोप


लाच देणे आणि घेणे हा कायद्याने गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून या गुन्ह्याविरुद्ध विभाग कारवाई करत असतो. मात्र नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात अनेक भागातील सरकारी कार्यालये जणू लाचखोरीची केंद्रे बनत चालली असल्याचा आरोप नागरीकांकडून सुरू आहे. दिवसेंदिवस लाचखोरीचे प्रकरण समोर येत असल्याने प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मागील आठवड्याची आकडेवारी बघता दररोज एक लाचखोरीचे प्रकरण समोर येत आहे. त्यामुळे एसीबी पथकाने सरकारी कार्यलयातील लाचखोरांना चांगलाच दणका दिला आहे. मात्र दुसरीकडे लाचखोरांना एसीबी विभाग पकडत असतानाही वारंवार घटना समोर येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कायदेशीर कामकाज करून देण्यासाठी कोणी शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणीही लाचेची मागणी करत असेल. तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवावे अथवा तक्रार नोंदवावी अशी आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नागरिकांना वारंवार करण्यात येते.