Holi 2022 : धुळवड हा सण विविध रंगाने साजरा केला जातो. परंतु, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामधील भोयरे या गावात चक्क एकमेकांना दगडे मारून धुळवड सण साजरा केला जातो. मोहोळ मधील भोयरे गावात दोन गटामध्ये एकमेकांवर दगडफेक करत होळी खेळण्याची परंपरा आहे.
 
भोयरे गावातील एक गट देवीच्या मंदिरावर थांबतो आणि दुसरा गट मंदिराच्या पायथ्याशी थांबतो. शिमग्याच्या दुसऱ्या दिवशी धुळीवडीला दिवसभर येथील तरुण दगडे-गोटे जमा करतात आणि संध्याकाळी त्याच दगडांनी एकमेकावर हल्लाबोल करुन धुळवड साजरी करतात. एकमेकांवर दगडांचा तुफान वर्षाव केला जातो. यामध्ये अनेक तरुण जखमी होतात. परंतु, हे जखमी लोक रूग्णालयात न जाता देवीच्या अंगाऱ्यावर नीट होतात, अशी लोकांची श्रद्धा आहे. 


धुळवड साजरी करत असताना जेवढे जास्त लोक जखमी होतील त्या वर्षी तेवढा जास्त पाऊस पडतो अशी गावकऱ्यांची धारणा आहे. त्यामुळे गावातील बहुसंख्य लोक जखमी होईपर्यंत ही धुळवड खेळतात. मागील दोन वर्षांत ही प्रथा पार पडली नाही. यंदा देखील पोलिसांनी गावाकऱ्यांना अशा पद्धतीने दगडफेक करीत धुळवड साजरी करू नये अशी विनंती केली होती. मात्र ग्रामस्थांनी आपली अनेक वर्षांची परंपरा यंदाच्या वर्षी देखील जपत रंगपंचमी साजरी केली.  


भोयरे हे जवळपास चार हजार लोकसंख्येचं गाव असून गावाचे ग्रामदैवत जगदंबा देवी आहे. एकमेकांना दगड मारून जखमी झाल्यानंतर लोक याच देवीचा अंगारा लावून बरे होतात, अशी श्रद्धा या गावात आहे. " अशा प्रकारची रंगपंचमी खेळताना आम्हाला कसलीही भीती वाटत नाही असे गावातील तरूण सांगतात. 
 
दरम्यान, हा कार्यक्रम पाहण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो लोक भोयरे गावात येत असतात. त्यामुले गावात मोठी  गर्दी होते. दगडफेक सुरू असताना कोणीच जवळ जात नाही. दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडांचा वर्षाव केला जातो. गेल्या अनेक वर्षांची ही आमची परंपरा असल्याचे गावकरी सांगता.  


महत्वाच्या बातम्या


Holi 2022: सचिन तेंडुलकर यांच्याकडून चाहत्यांना होळीच्या खास शुभेच्छा


Happy Holi 2022: दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचं होळी सेलिब्रेशन! एकमेकांवर रंग उधळून खेळाडूंनी लुटला आनंद


Happy Holi 2022 Wishes : तुमच्या प्रियजनांना 'या' खास शुभेच्छा देऊन होळीचा आनंद द्विगुणित करा