Solapur Accident News : सांगोला तालुक्यात झालेल्या एका भीषण अपघातात पंढरपूर तालुक्यातील तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने तालुक्यातील खर्डी गावावर शोककळा पसरली आहे.  अलीकडील काळात अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले  आहे. रस्ते, चालक अथवा इतर कारणांमुळे अपघातांच्या घटना घडत आहे. त्यातच चालक प्रचंड वेगाने वाहने चालवतात.  सिमेंटचे रस्ते चकचक झाल्यापासून वाहनांच्या वेगाला मर्यादा उरली नसून रोज अनेकांचे प्राण अपघातात जात असल्याचे समोर येत आहे.   धुळवडीचा सण सगळीकडे साजरा केला जात असताना पंढरपूर तालुक्यावर मात्र दुख: व्यक्त करण्याची वेळ आली आहे. पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील तिघांचा सांगोला तालुक्यातील अपघातात मृत्यू झाला आहे.


सांगोला तालुक्यातील सोनंद गावाजवळ शुक्रवारी हा अपघात झाला असून यात पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील तीन तरुणांचा मृत्यू झाला. खर्डी येथील तीन तरुण खर्डी येथून सांगोला तालुक्यातील सोनंद येथे देवदर्शनासाठी एकाच बुलेटवरून गेले होते. सोनंद येथे दर्शन घेवून ते परत खर्डी गावाकडे निघालेले असताना एका ट्रकने त्यांच्या बुलेटला जोरदार धडक दिली आणि भीषण अपघात झाला. या अपघातात अक्षय मलपे, शरद गजले आणि आदिनाथ मंडले यांचा मृत्यू झाला आहे. अपघात होताच गावकरी मदतीला धावले आणि त्यांनी जखमी असलेल्या दोघांना लगेच उपचारासाठी सांगोला येथील रुग्णालयात दाखल केले. दुर्दैवाने उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.


आज धुळवडीचा दिवस असल्याने सगळीकडे आनंदी आनंद असताना पंढरपूर तालुक्यावर, विशेषत: खर्डी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सणासुदीच्या दिवशी एकाच गावातील तीन तरुणांचा मृत्यू होणे ही अत्यंत क्लेशकारक आणि दुर्दैवी घटना असून गावातील प्रत्येकजण हळहळत आहे. हृदयाला पीळ पाडणारी ही घटना असून तालुक्यातून देखील दुःख व्यक्त केले जात आहे. एकाच दिवशी एकाच गावात तीन कुटुंबावर झालेला हा आघात प्रचंड मोठा आहे.