उस्मानाबाद: इतिहासातील लढायांमध्ये तोफांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ज्या तोफांनी शत्रूच्या उरात धडकी भरवली, गडकोट अभेद्य राखले; त्याच तोफांकडे पाहायला आज कोणालाही वेळ नाही. आज या तोफा झाडा-झुडपात पडल्या आहेत. त्यामुळे त्याच्यावर कोणाचेही लक्ष नाही हे पाहून चोरट्यांनी यावरच डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील गडकोटावरुन  60 किलोपासून 400 किलोपर्यंत वजनाच्या तोफा चोरीला गेल्या आहेत.

2014 पासून हे चोरीचं सत्र सुरु झालं. 2014मध्ये विजयदुर्गवरची 400 किलो वजनाची तोफ चोरीला गेली. त्यानंतर 2015 मध्ये मुरुडच्या पद्मदुर्ग किल्ल्यावरची 60 किलो वजनाची तोफ चोरीला गेली. याचवर्षी औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातली किल्ले अंतूरवरची तोफेची चोरी झाली. जंजिरा किल्ल्यावरच्या दीडशे तोफांपैकी आता फक्त 68 तोफा उरल्या आहेत.

जुलै महिन्यात या औसा भुईकोट किल्ल्यातल्या पंचधातूच्या तोफेची चोरी झाली. चोरीला गेलेली तोफ 50 किलो वजनाची आणि साडेतीन फूट लांब होती. पोलिसांनी आपल्या दफ्तरी तोफेची किंमत 10 हजार नोंदवली आहे. याशिवाय उदगीर, नळदुर्ग, कर्नाटकच्या बिदर किल्ल्यातून तोफा त्यावरचे साहित्य चोरीला जाण्याच्या घटना घडल्यात.

या तोफा मराठेशाही, ब्रिटिशकालीन आणि पोर्तुगीजांच्या काळातील आहेत. पंचधातूच्या म्हणजे मिश्र आणि पोलादापासून तयार केलेल्या आहेत. अनेक तोफांवर पर्शियन, फ्रेंच, इंग्लिश भाषेत वर्णन लिहिलेले आहे. मजकुरात ऐतिहासिक. चोरट्यांना पंचधातूतल्या सोन्यात रस आहे. चोरट्यांच्या लेखी या तोफांचं महत्त्व चोरण्याची वस्तू एवढचं असलं, तरी महाराष्ट्रासाठी हा इतिहास आहे.

व्हिडिओ पाहा