मुंबई : पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील रुंदीकरणात 1811 सालातील ऐतिहासिक 'बाजीराव विहीर' येत असल्याने तिचे संवर्धन व्हावे यासाठी स्थानिक सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विनंती केली होती. याची दखल घेत या ऐतिहासिक विहिरीचे जतन करत तिला धक्का न लागता मार्ग काढण्याच्या सूचना गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


दरम्यान या विहिरीचा इतिहास आता नव्याने समोर आला असून या विहिरीचे बांधकाम 1811 साली झाल्याचे पुरावे समोर आले आहेत. दुसरे बाजीराव पेशवे आषाढी वारीसाठी पंढरपूरला नियमित वारीला येत असताना त्यांनी ही विहीर व 15 बिघे जमीन त्या काळातील सरदार खाजगीवाले यांचेकडून घेत ती विठ्ठल मंदिराला दिली होती. विठुरायाला रोज लागणाऱ्या तुळशी व फुलांची सोय या विहिरीच्या पाण्यावर शेजारील जमिनीत करून त्याचा वापर देवासाठी करावा अशी बाजीराव पेशवे यांची संकल्पना होती. त्यानुसार त्यांनी या जमीन व विहिरीच्या बदल्यात खाजगीवाले यांना 15 बिघे जमीन देताना विहिरीचे वेगळे 400 रुपये दिल्याचे पुरावे समोर आले आहेत . त्यामुळे ही विहीर थेट विठ्ठलाची विहीर अशी त्याकाळी ओळखली जात असल्याचे इतिहास अभ्यासक व मोडी लिपीचे तज्ज्ञ राज मेमाणे यांनी सांगितले आहे. याबाबतचे सर्व पुरावे मेमाणे यांच्याकडे असून त्यांनी याबाबतचे एक पत्र पुरातत्व विभागाला लिहिल्यावर पुरातत्व विभागाने ही विहीर पुरातन असल्याचे मान्य करीत रस्त्याच्या बांधकामात पडली जाऊ नये अशी विनंती करणारे पत्र सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे.


सध्या वारकरी संप्रदायासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी कोट्यवधी रुपये खर्चून राष्ट्रीय महामार्ग 965 अर्थात संत ज्ञानेश्वर पालखी मार्गाचे काम हाती घेतले आहे. याच कामातील सर्व्हिस रोडमध्ये ही विठुरायाची विहीर येत असल्याने अधिकाऱ्यांनी ती पडण्याची तयारी चालवली होती. याच जागी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील उभे रिंगण होत असून वर्षानुवर्षे हे रिंगण बाजीराव विहीर रिंगण म्हणून ओळखले जाते. देवाची ही आखीव रेखीव बांधलेली विहीर वाचवण्यासाठी आता आमदार गोपीचंद पडळकर यांनीही नितीन गडकरी यांना पत्र लिहून विनंती केली होती.


संबंधित बातम्या :



पालखी मार्गावरील 1811 सालातील बाजीराव विहिरीचा इतिहास नव्याने समोर, विहीर वाचवण्यासाठी पुरातत्त्व विभागाचा पुढाकार