Hingoli News : मागील काही वर्षात अनेक गावांत अनधिकृतरीत्या महापुरुषांचा पुतळा बसवण्याच्या घटना वाढल्या आहेत. अनेकदा यावरून गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात देखील अशाच काही घटना समोर आल्या आहे. अशा घटना गावात घडल्यावर पोलीस पाटलांकडून पोलिसांना आणि प्रशासनाला याची माहिती देणे बंधनकारक असते. मात्र हिंगोली जिल्ह्यातील एका गावात अनधिकृतरीत्या महापुरुषांचा पुतळा बसवल्याची माहिती पोलिसांना न देणे एका पोलीस पाटलाला महागात पडले आहे. कारण या प्रकरणात या पोलीस पाटलाला तीन महिन्यांसाठी शासन सेवेतून निलंबित करण्यात आले.


हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथील पोलिस पाटील विलास माणिकराव चव्हाण यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तीन महिन्यांसाठी शासन सेवेतून निलंबित करण्यात आले. याबाबतचे आदेश वसमतचे उपविभागीय दंडाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी काढले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आडगाव रंजे येथे 7 जून रोजी महापुरुषांचा पुतळा अनधिकृतरीत्या बसवण्यात आला. या अनुषंगाने सदरची माहिती प्रशासनाला कळविणे गरजेचे होते. मात्र पोलिस पाटील चव्हाण यांनी ही माहिती प्रशासनाला कळविली नाही.


गावात अनधिकृतरीत्या महापुरुषांचा पुतळा बसवण्यात आल्यावर देखील पोलिसांना पोलीस पाटील चव्हाण यांनी माहिती कळवली नाही. त्यामुळे हट्टा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांनी पोलिस पाटील चव्हाण यांना सदरची माहिती न देण्याबाबत विचारणा केली. यावर त्यांच्याकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यावरून सपोनि बोराटे यांनी त्यांचा कसुरी रिपोर्ट उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ यांच्याकडे पाठविला होता. उपविभागीय अधिकारी कार्यालयानेही त्यांना खुलासा सादर करण्यासाठी नोटीस दिली होती. मात्र दिलेला खुलासाही समाधानकारक नसल्याने चव्हाण यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी उपविभागीय दंडाधिकारी डॉ. खल्लाळ यांनी चव्हाण यांना तीन महिन्यासाठी निलंबित केल्याचे आदेश काढले आहेत.


पोलीस पाटलांवर असतो राजकीय दबाव 


प्रत्येक गावात शासनाकडून एका पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. यासाठी त्यांना मानधन देखील जाते. गावातील कायदा सुव्यवस्था आणि गावातील अवैध धंदे याची माहिती पोलिसांना मिळावी यासाठी पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. मात्र, अनेकदा पोलीस पाटलांवर गावातील राजकीय लोकांचा दबाव असतो. त्यात पोलीस पाटील याला गावातच राहावे लागते, त्यामुळे अनेकदा अनेक गोष्टीकडे ते दुर्लक्ष करतात. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Hingoli News : नांदेडमधून तडीपार केल्यावर दरोड्यासाठी हिंगोलीत पोहोचले; पण पोलिसांना टीप मिळाली अन् गेम फसला