Hingoli News Update : हिंगोली जिल्ह्यात खतांचा काळा बाजार उघड झाला आहे. डीएपी खताच्या  एका बॅगची किंमत 1350 रुपये आहे. परंतु, खत विक्रेते ही बॅग 450 रुपयांना विकत आहेत. या एका खताच्या बॅग सोबत दहा किलोची सल्फरची बॅग जबरदस्तीने शेतकऱ्याला विकली जात आहे. विक्रेत्यांकडून जास्त दराने खत विक्री होत असलेला   व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. 


हिंगोली जिल्ह्यातील खतांचा हा काळा बाजार स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उघड करण्यात आला आहे. सध्या खरीप हंगाम जवळ आला आहे. त्यामुळे शेतकरी खते आणि बियाणे खरेदी करण्याच्या तयारीला लागला आहे. अनेक शेतकरी खते खरेदी करण्यासाठी कृषी निविष्ठाधारक कृषी केंद्रावर जात आहेत. मात्र हिंगोली जिल्ह्यात कृषी दुकानांमध्ये शेतकऱ्यांची लूट होत असल्याचे समोर आले आहे.


सध्या केंद्र सरकारकडून खतांचे दर निर्धारित केले असताना खत दुकानात अवाच्या सवा भावाने विक्री होताना पाहावयास मिळत आहे. DAP चे भाव  1350 एवढे  असताना दुकानात हे खत 1450 रूपयांना विकले जात आहे. शिवाय त्याच्यासोबत आणखी इतर खते घेणे बंधनकारक नसताना 10 कीलो सल्फर दिले जात आहे. आता या प्रकरणात कृषी विभाग काय कार्यवाही करणार हे बघणे महत्त्वाचे आहे.


जिल्ह्याला 82 हजार 500 टन रासायनिक खतांचा पुरवठा 


हिंगोली जिल्ह्याला खरीप हंगामासाठी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा करण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्याला 82 हजार 500 यान खत पुरवठा केला आहे. यात युरिया डीएपीसह अन्य खतांचा समावेश आहे. तरीही खत विक्रेते मात्र, खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करत आहेत आणि शेतकऱ्यांची लूट करत आहेत. त्यामुळे जास्त दराने होणारी खतांची विक्री थांबवून जे शेतकरी जास्त दराने खतांची विक्री करत आहेत, अशा खत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. या प्रकरणी कृषी विभागाकडे काही शेतकऱ्यांनी तक्रार देखील केल्याची माहिती मिळत आहे.