Hingoli News : जिल्हा नियोजन समितीच्या कामाचे बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक करणाऱ्या तत्कालीन महिला सरपंच आणि दोन ग्रामसेवकांच्या विरोधामध्ये सेनगाव कोर्टाच्या आदेशानंतर सेनगाव पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीसह अन्य विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


2012 ते 2017 या कालावधीत दरम्यान हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात येणाऱ्या धानोरा गावांमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या वतीने विकास कामासाठी निधी उपलब्ध झाला होता. या निधीची विल्हेवाट लावण्यासाठी बनावट कागदपत्र तयार करून हा निधी विकास कामासाठी वापरल्याचा बनाव करत अपहार करण्यात आला होता. याबाबतची तक्रार सामाजिक कार्यकर्ते गणेश गडदे यांनी सेनगाव प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल करून कारवाईची मागणी केली होती. त्या नंतर सेनगाव कोर्टाने यात काल या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश सेनगाव पोलिसांना दिले होते.


सेनगाव कोर्टाने दिलेल्या आदेशनुसार काल सेनगाव पोलिसांनी या प्रकरणात तक्रारदार गणेश गडदे यांच्या तक्रारीवरून तत्कालीन महिला सरपंच द्रोपदाबाई कराळे यांच्यासह अन्य दोन ग्रामसेवकावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या प्रकरणात आता पुढील तपास सेनगाव पोलिस करत आहेत 


85 हजार रुपयांचा अपहार - पोलीस सूत्रांची माहिती 


या प्रकरणांमध्ये पोलीस सूत्रांच्या मिळालेल्या माहिती अनुसार गावाच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या वतीने निधी मंजूर करून देण्यात आला होता. परंतु या निधीचा अपहार करून बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाच्या रेकॉर्डवर दाखविण्यात आले. हे प्रकरण लक्षात आल्यानंतर गणेश गडदे यांनी यावर आक्षेप घेतला. आता न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.