Water crisis : संपूर्ण मराठवाड्यामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्यासाठी पाणी मिळत नाही, अशा अवस्थेत फळबागा कशा जोपासायच्या? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय. हिंगोली जिल्ह्यांमध्ये केळी आणि पपईच्या फळबागांची अवस्था दयनीय झाली आहे.
संपूर्ण मराठवाड्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. घोटभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. जिथे पिण्यासाठीच पाणी नाही, तिथं शेतातील फळबागा कशा जोपासायच्या ? असा प्रश्न पडलाय हिंगोली जिल्ह्यांमध्ये केळी आणि पपईच्या फळबागा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. परंतु या फळबागा कशा जोपासायच्या? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय. हिंगोली जिल्ह्यातील आसोला येथील बालाजी ढोबळे यांनी त्यांच्याकडे असलेल्या विहिरीतील पाण्याच्या भरवशावर शेतामध्ये दोन एकर वर केळीची फळबाग लावली. परंतु आता विहिरीने तळ घातल्यामुळे हे फळबाग कशी जोपासायची असा प्रश्न ढोबळे यांना पडला आहे. हजारो रुपये खर्च करून शेतामध्ये ही दोन एकरची फळबाग जोपासली आहे. परंतु पाणी कमी पडत असल्यामुळे आणि वाढतं तापमान यामुळे केळीची फळबाग होरपळून निघत आहे. परिणामी केळीचे पाने पिवळी पडत आहेत वाळून जात आहेत, तर अनेक पान फाटली आहेत. या वाढत्या तापमानात ही केळीची फळबाग जोपासायची असेल तर कमीत कमी आठ तास केळीला पाणी देणे गरजेचे आहे. परंतु जलसाठ्यांनी तळ गाठल्यामुळे केळीला पाणी कमी पडत आहे परिणामी मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे.
हिंगोली जिल्ह्यातील पपईच्या फळबागांची जलसाठ्यांनी तळ गाठल्यामुळे पपईंच्या पिकाला पाणी देण्यासाठी पाणीच नाही. त्यामुळे पपईच्या फळबागा सुद्धा वाळून जात आहे का? झाडाला लागलेली फळे वाढत्या तापमानामुळे होरपळून जात आहेत. त्यामुळे ऐन पपई विक्रीच्या काळातच पाणीटंचाई आणि तापमान वाढत आहे. त्यामुळे पपईच्या फळबागांना फटका बसतोय.
परभणी जिल्ह्यात 17 टँकरने पाणी पुरवठा
परभणी जिल्ह्यात मराठवाड्यातलं दुसरे मोठे धरण येलदरी असताना जिंतूर तालुक्यामध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. धरण उशाला कोरड घशाला अशी म्हणण्याची वेळ जिंतूर तालुका वासियांवर आली. कारण जिंतूर तालुक्यामध्ये जिल्ह्यात सुरू असलेल्या 17 पैकी 11 टँकर जिंतूरमध्ये सुरू आहेत. 154 विंधन विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे. धरणात पाणी असताना तालुक्यातील अनेक गावांना पाणी मिळत नसल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली. तर जिंतुरच्या ब्राम्हणगाव येथे विहिरी बोअर आटल्याने टँकर आणुन 80 फूट खोल विहिरीत टाकुन तिथून महिलांना लहान मुलांना पाणी भरावे लागत आहे.